सांगली : कांचनपूर (ता. मिरज) गावाच्या पूर्वेस असलेल्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात बिबट्याचाच वावर असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. बुधवारी (ता. ५) रात्री बिबट्याने एका कुत्र्याला फरफटत नेऊन ठार मारल्याचा प्रकार समोर आला. ग्रामस्थांना सडलेल्या अवस्थेत हे कुत्रे सापडल्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाला पाचारण केले. अधिकाऱ्यांनी पाहणी करून परिसरात बिबट्या असल्याच्या माहितीला दुजोरा दिला असून, ग्रामस्थांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
कांचनपूरच्या पूर्वेस बुधवारी रात्री माजी सैनिक पोपट आनंदराव पाटील व त्यांच्या पुतण्याला माेटारीतून प्रवास करताना बिबट्याचे थेट दर्शन झाले होते. कांचनपूर-सोनी मार्गावर रस्ता ओलांडून बिबट्या कृषी विज्ञान केंद्राच्या नारळबागेकडे गेल्याचे दिसले. त्यांनी तातडीने याची माहिती ग्रामस्थांना देऊन वन विभागाला कळवले होते; मात्र पावसामुळे त्या रात्री पाऊलखुणा मिळाल्या नव्हत्या.
दरम्यान, कृषी विज्ञान केंद्र परिसरातील वस्तीवर सडलेल्या कुत्र्याची दुर्गंधी पसरल्यानंतर ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी सरपंच व पोलिस पाटलांसह वन विभागाला माहिती दिली. वनरक्षक गणेश भोसले व सचिन साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, कुत्र्यावरील हल्ल्याची पद्धत आणि खुणांवरून त्यांनी बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट केले. यावेळी कांचनपूरचे सरपंच दगडू गोरे, पोलिस पाटील समीर पाटील, सुरेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.