कासेगाव : बांबवडे (ता. शिराळा) येथील शेतकरी चंद्रकांत शंकर माने यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये मोठ्या पाईपमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाला.
स्थानिक शेतकऱ्यांमार्फत सदर घटनेची माहिती अनिल वाजे (वनपाल) यांना दिली. ते स्वाती कोकरे, दत्तात्रय शिंदे वनरक्षक, रेस्क्यू टीम शिराळा संतोष कदम, संकेत गायकवाड, हर्षल जाधव, तुषार लोंढे, सह्याद्री वॉरियर्सचे सुशीलकुमार गायकवाड यांच्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची पाहणी केली असता, शेतकऱ्यांनी जमिनीतील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरिता मोठी पाईप भूमिगत टाकली होती. त्या पाईपमध्ये हा वन्यप्राणी बिबट्या अडकला असल्याचे दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. सदर वन्यप्राणी बिबट्याला शिराळा येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात आणले व पशुवैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सातव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. किरण शिसाळ, पशुधन विकास अधिकारी टाकवे व अनिल पारधी यांनी मृत बिबट्याची पाहणी करून शवविच्छेदन केले.
नवनाथ कांबळे सहायक वनसंरक्षक सांगली, रमेश कांबळे वनक्षेत्रपाल शिराळा यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल वाजे वनपाल बिळाशी, स्वाती कोकरे वनरक्षक खुजगाव, दत्तात्रय शिंदे वनरक्षक, दादा शेटके, आदिक शेटके, वनसेवक सुभाष पाटील, शिवाजी सावंत वनसेवक, संतोष कदम, संकेत गायकवाड, हर्षल जाधव, तुषार लोंढे रेस्क्यू टीम सदस्य शिराळा यांनी शिराळा येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात बिबट्याचे दहन केले.