कुरळप : वशी (ता. वाळवा) येथील येलूर रस्त्यावर असणाऱ्या जयसिंग पाटील यांच्या उसाच्या फडात बिबट्याची चार पिले आढळली. रविवारी सकाळच्या सुमारास शेतात ऊस तोडणीसाठी गेलेल्या मजुरांना फडात हालचाल जाणवली. त्यांनी पाहणी केली असता, तेथे बिबट्याची चार पिले दिसून आली.
घटनेची माहिती सरपंच व पदाधिकाऱ्यांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांची गर्दी दूर ठेवण्यात आली. पिलांना कोणताही धोका होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली. वन विभागाने चारही पिलांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यांची प्राथमिक तपासणी केली. पिलांची प्रकृती स्थिर असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. या बिबट्यांची मादी आसपासच असण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरात सतर्कता ठेवली आहे. शेतकरी व ग्रामस्थांना अनावश्यक गर्दी न करण्याचे व वन्यप्राण्यांच्या हालचाली आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने पंधरा मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. यानंतर उसाच्या फडात पिले आढळल्याने बिबट्याचा अधिवास समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.