सांगली : विटा येथील वकील विशाल प्रकाश कुंभार यांना मारहाण करून पोलिसांनी घरातील डीव्हीआर नेला आहे. याबद्दल दोषी पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी वकिलांच्या शिष्टमंडळाला दिले.
अॅड. विशाल कुंभार यांच्या घराजवळ एक तडीपार गुंड राहत असल्याच्या कारणावरून गेली सहा महिने झाले 8 ते 10 पोलिस रात्री- अपरात्री कुंभार यांच्या घराजवळ जाऊन सेल्फी काढणे, मोठ-मोठ्याने दंगा करणे, असे कृत्य करत होते. कुंभार व त्या परिसरातील लोकांना त्रास होत असल्याची तक्रार कुंभार यांनी अनेकदा केली होती. त्याचा राग मनात धरून शनिवारी रात्री एक फौजदार व सुमारे आठ पोलिसांनी कुंभार यांना अंगावरील अर्ध्या कपड्यातच उघड्या पोलिस गाडीत घालून शिवीगाळ करून फरफटत पोलिस ठाण्यात नेले असल्याचा वकिलांचा आरोप आहे. या घटनेनंतर सोमवारी विटा वकील संघटनेने आंदोलन करत दोषी पोलिस अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे बुधवारी सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील वकील संघटनांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचे व प्रशासनाला निवेदन देण्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार सकाळी ज्येष्ठ वकील अॅड. श्रीकांत जाधव, अॅड. चंद्रकांत माने, अॅड. सविता शेडबाळे, गिरीश तपकिरे, अॅड. सविता शेडबाळे, अॅड. सुनील दोषी, विटा येथील अॅड. शौर्या पवार, प्रमोद सुतार, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे, विटा वकील संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी मोर्चाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे गेले. प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर सुमारे 800 वकिलांचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तिथे वकिलांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकार्यांना भेटून कारवाईबाबत निवेदन दिले.
जिल्हा न्यायालयमध्ये वकिलांची सभा झाली. पोलिसांकडून विशाल कुंभार यांच्यावर विनयभंग व अॅट्रॉसिटी सारखा खोटा गुन्हा नोंद होण्याची भीती अनेक वकिलांनी यावेळी व्यक्त केली. तसेच दोषी पोलिसावर दोन दिवसात गुन्हे दाखल न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा विविध वक्त्यांनी यावेळी दिला.