आषाढी वारीसाठी पंढरपूरसाठी विशेष रेल्‍वेंचे नियोजन  File Photo
सांगली

Sangli | चिंतामणीनगर रेल्वे पुलावर बाजूने वाहतूक सुरु

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

येथील चिंतामणीनगर रेल्वे पुलावरून एका लेनवरून हलक्या वाहनांची वाहतूक आज नागरिकांनीच सुरू केली. याला ठेकेदारांनीही मूक सहमती दिली. या पुलावरून डांबरीकरण आणि पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यास किमान महिन्याचा कालावधी लागणार आहे.

पुलावर १५ ऑक्टोबरपासून डांबरीकरण सुरू करण्यात येणार आहे. आता रेल्वे पुलालगतचे तीन वृक्ष तोडण्यात येणार असून, यातील एक वृक्ष तोडण्यात आला आहे. माधवनगर रोडवरील रेल्वे पूल जुना झाल्याने व त्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढल्याने हा पूल नव्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचबरोबर मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरू असल्यामुळे या पुलाची रुंदी वाढवण्यासाठी हा पूल मे २०२३ मध्ये पाडण्यात आला. जानेवारी २०२४ अखेर या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे, अशी अट घालण्यात आली होती. मात्र पुलाखालून मार्ग काढण्याची (अंडर पास) मागणी झाल्याने या पुलाचा खर्च वाढण्याबरोबरच कामाचा अवधीही वाढत गेला. यामुळे प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. याबाबत आंदोलनेही झाली. यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी याचे बांधकाम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

पुलावरून एका बाजूची लेन खडी टाकून पूर्ण झाल्याने नागरिकांनी आज रविवारी सकाळपासूनच या मार्गावरून वाहतूक सुरू केली. पुलाच्या ठेकेदारांनीही यास सहमती दिली आहे. अवजड वाहनासाठी मात्र अजून बंदी घालण्यात आली आहे. एका बाजूला अजूनही भराव टाकण्याचे काम सुरू असतानाच वाहतूक सुरू झाली आहे.

पुलाचे काम अजूनही सुरू आहे, असे असताना थांबून, थांबून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. एका लेनवरून वाहतूक आज सुरू झाली असली तरी याचे डांबरीकरण करणे, फूटपाथ करून, कठडा करण्याचे काम सुरूच असल्यामुळे अजूनही किमान महिनाभर याचे काम चालणार असल्याची माहिती ठेकेदारांनी दिली.

पुलानंतर रुंदीकरणाची गरज

पुलाची रुंदी २१.१ मीटर आहे. यामुळे पूल संपल्यानंतर पुढील रस्ता हा त्यामानाने अरुंद आहे. यामुळे पुढील रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे.

पुलालगतचे एक चिंचेचे झाड आता हटवण्यात आले असून इतर दोन झाडे तोडण्यात येणार आहेत.

अंडरपास आणि पावसामुळे पुलाचे बांधकाम लांबले. आता एकेरी वाहतूक ही पुलावरील मुरूमीकरणावर दाब आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. खळगे पडतील तसे मुरूमीकरण करण्यात येईल. आता डांबरीकरण १५ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. दोन्ही लेन सुरू होण्यासाठी अजून एक महिना वाट पाहावी लागणार आहे.
एम. एम. शिंदे अभियंता, बांधकाम विभाग, रेल्वे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT