कुपवाड : पैशाच्या देवाण-घेवाणीतून सराईत गुन्हेगार महेश ऊर्फ पिल्या आनंदा पारछे (वय 28, रा. सिद्धनाथ कॉलनी, भारत सूत गिरणीजवळ, कुपवाड) याच्यावर दोन सराईत गुन्हेगारांनी गोळीबार केला. डाव्या मांडीला गोळी लागून पारछे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (दि. 17) मध्यरात्री घडली. घटनेनंतर कुपवाड पोलिसांनी तत्काळ हालचाली करत अवघ्या चार तासांत हल्लेखोरांना अटक केली.
राहुल सुभाष माने (वय 34, रा. संकल्पनगर, बामणोली ता. मिरज) व गणेश सदाशिव खोत (वय 35, रा. शांत कॉलनी, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
जखमी पारछे व हल्लेखोर माने आणि खोत हे मित्र आहेत. मध्यरात्री तिघेही भारत सूत गिरणी चौकातून मोटारीतून (एमएच 10 ईआर 8262) कुपवाडकडे जात होते. संशयित राहुल माने व गणेश खोत या दोघांचा महेश पारछे याच्यासोबत पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला. यावेळी गणेश याने महेश याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून ‘तुला जिवंत ठेवत नाही’ अशी दमदाटी करून धमकी दिली. यावेळी संशयित राहुल याने रागाच्या भरात महेश याच्या दिशेने गोळी झाडली, ती महेशच्या डाव्या मांडीला लागली. यात तो गंभीर जखमी झाला.
याबाबतची माहिती मिळताच सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्यासह कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांना जेरबंद केले. हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली 15 लाख रुपये किमतीची आलिशान मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
संशयित राहुल व गणेश तसेच जखमी महेश हे सराईत गुन्हेगार आहेत. पारछे याच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर माने व खोत या दोघांविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.