कुपवाड : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून देशी दारूच्या दुकानात बसलेल्या सचिन महादेव अपराज-माने (वय 23, रा. बामणोली कमानीजवळ, ता. मिरज) या तरुणाच्या डोक्यात आणि तोंडावर कुऱ्हाड व फावड्याने घाव घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून काही तासातच दोन संशयितांना अटक केली आहे. रोहन ऊर्फ शुभम वाघमोडे (वय 23, रा. बामणोली) आणि सुनील राजाराम दुधाळ (29, रा. दत्तनगर, बामणोली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, मृत सचिन अपराज हा कुटुंबासह बामणोली येथील कमानीजवळ रोहन पाटील यांच्या घरी भाड्याने राहत होता. चार दिवसांपूर्वी सचिन आणि संशयित रोहन वाघमोडे व सुनील दुधाळ यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला होता. रविवारी सायंकाळी सचिन हा कुपवाड-बामणोली रस्त्यावरील एका देशी दारूच्या दुकानात बसला होता. याची माहिती मिळताच संशयित वाघमोडे आणि दुधाळ तिथे हत्यारांसह पोहोचले. त्यांनी सचिनवर कुऱ्हाड आणि फावड्याने सपासप वार केले. सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून सोमवारी रात्री उशिरा दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी मृत सचिनची आई रूपाली अपराज यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.