कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील बंद अवस्थेत असलेल्या सांडपाणी प्रकल्पासमोरील रस्त्यावर एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. उमेश मच्छिंद्र पाटील (वय 21, रा. श्रीनगर, मशिदीजवळ, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक व कुपवाड पोलिसांनी दोघा संशयितांना 24 तासात जेरबंद केले. संशयितांनी प्रेमप्रकरणातून उमेशचा खून केल्याची कबुली दिली.
साहिल ऊर्फ सुमित मधुकर खिलारी (वय 24, सध्या रा. बामणोली, ता. मिरज, मूळ गाव बुलडाणा), सोन्या ऊर्फ अथर्व किशोर शिंदे (वय 20, रा. बामणोली, ता. मिरज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. एका बालगुन्हेगाराचा यात समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमेश पाटील हा कुपवाड औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत होता. तो शुक्रवारी सकाळी 9 वाजता कामावर गेला होता. कामावर जाण्यासाठी त्याने महिन्याभरापूर्वी नवीन दुचाकी (क्र. एमएच 10 ईएन 6601) घेतली होती. रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास उमेश पाटील हा काम करीत असलेल्या कंपनीतील एक कामगार घाईघाईने त्याच्या घरी आला. त्याने उमेशचे आई-वडील व भावाला सांगितले की, उमेशला काहीतरी झाले आहे, तो नटराज कंपनीजवळ पडला आहे.
उमेशचा भाऊ महेश हा त्या कामगाराच्या दुचाकीवर बसून घटनास्थळी गेला. यावेळी उमेश जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्द पडलेला दिसला. त्याच्या डोक्यात वार झाले होते. घटनास्थळी तो काम करीत असलेल्या कंपनीचे मालक विनायक घुळी व इतर कामगार होते. महेश पाटील व कामगार जकाप्पा लवटे यांनी आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने त्याला रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक पंकज पवार, हवालदार सतीश माने, सागर लवटे यांना, उमेश पाटील याच्यावर हल्ला करणारा साहिल ऊर्फ सुमित खिलारी हा कुपवाडमध्ये वन विभागाच्या कार्यालयाजवळ थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साहिल खिलारी असे नाव सांगितले. मित्र सोन्या ऊर्फ अथर्व शिंदे व एक अल्पवयीन, अशा तिघांनी मिळून उमेश पाटील याच्याशी प्रेमप्रकरणातून वाद झाल्याने त्याचा डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करून खून केल्याची कबुली दिली.
या माहितीआधारे कुपवाड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक विश्वजित गाडवे, हवालदार संदीप पाटील यांनी दुसरा संशयित सोन्या ऊर्फ अथर्व शिंदे याला कवलापूर विमानतळ येथून ताब्यात घेतले. संशयित सोन्या शिंदे यानेही उमेश पाटील याचा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी उमेश पाटील याचा भाऊ महेश पाटील याने कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर अधिक तपास करीत आहेत.