कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील लठ्ठे पॉलिटेक्निक कॉलेजसमोरील रस्त्यावर मोहम्मदगौस गुलमोहम्मद मोमीन (वय 59, रा. शाही दरबार हॉलजवळ, टाकळी रोड, मिरज) या कामगाराला चौघांनी चाकूचा धाक दाखवून लुबाडले. मोमीन यांच्या खिशातील 7 हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला. याबाबतची तक्रार कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहम्मदगौस मोमीन व त्यांचा मुलगा नदीम हे दोघे गुरुवार, दि. 31 रोजी मध्यरात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास सायकलवरून कुपवाड एमआयडीसीतून काम संपवून घरी जात होते. लठ्ठे पॉलिटेक्निक समोरील रस्त्यावर चौघांनी चाकूचा धाक दाखवून त्यांना अडविले.
चौघांपैकी एकाने मोमीन यांच्या खिशातील 7 हजार रुपयांचा मोबाईल काढून घेतला. याबाबत मोमीन यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. कुपवाड पोलिस तपास करीत आहेत.