ATM machine Theft  Pudhari
सांगली

Kupwad ATM Theft: कुपवाडला दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न

चोरटे सीसीटीव्हीत कैद; रोकड शाबूत

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : शहरातील आर. पी. पाटील चौक, बाजारपेठ परिसरातील एसबीआय आणि हिताची या दोन बँकांची एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी मशीनचे नुकसान केले असले, तरी लाखोंची रोकड चोरण्यात त्यांना अपयश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य बाजारपेठेत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि हिताची या दोन्ही बँकांच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी ही माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मशीन फोडताना दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे.

चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी मशीनची स्क्रीन तोडून बाहेर काढली होती. मात्र, तिजोरीपर्यंत पोहोचता न आल्याने आणि रोकड हाती न लागल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने पळ काढावा लागला. या घटनेची माहिती शहरात पसरताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा केला आहे. या गुन्ह्यातील संशयितांना लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास कुपवाड पोलिसांनी व्यक्त केला आहे. कुपवाड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT