शिराळा शहर : जमिनीच्या तुकड्यासाठी भावकीत हयातभर भांडणे सुरू असतात. कोणी कोणाच्या ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतो. परंतु भैरववाडी (ता. शिराळा) येथील कुलकर्णी परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत आपली जमीन शाळा व अंगणवाडीसाठी विनामोबदला दान केली.
भैरववाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीसाठी आता हक्काची जमीन मिळाली. 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागला. हे घडवून आणण्यात येथील उपसरपंच इंद्रजित सदानंद खराडे यांनी विशेष पुढाकार घेतला. कुलकर्णी परिवार हा मुंबई, पुणे येथे स्थायिक आहे.
व्यवसाय, नोकरीनिमित्त सर्वजण संबंधित शहरात असतात. हे सर्वजण एकत्र गावी भैरववाडी येथे आले. त्यांनी पुढाकार घेऊन शिराळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची प्रक्रिया 25 एप्रिल रोजी पूर्ण केली. या जमीनदात्यांनी बक्षीसपत्र करून देताना जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडीच्या स्थापनेसाठी जागा दिली. या कार्याची दखल घेत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी पंचायत समिती शिराळा येथे एक विशेष कार्यक्रमात उपसरपंच इंद्रजित खराडे व सर्व जमीन दात्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.
भैरववाडी येथील मधुकर अनंत कुलकर्णी,रमेश अनंत कुलकर्णी, सुधाकर भाऊराव कुलकर्णी, माणिकराव अनंत कुलकर्णी, श्रीकांत अनंत कुलकर्णी या जमीन मालकांनी सामाजिक बांधिलकीतून उदारहस्ते एकूण आठ आर (गुंठे) क्षेत्रफळाची जमीन विना मोबदला दिली. ही सर्व मंडळी नातेवाईक आहेत. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, मुंबई तसेच परदेशात स्थायिक झालेली आहेत. त्यांची गावाकडे आणखी जमीन आहे. त्यांनी जमीन दान करण्याचे ठरवल्याने शाळेसाठी जमिनीचा ग्रामस्थांचा शोध थांबला.
शिक्षण व बालविकासासाठी जमीन उपलब्ध करून देणे हे फार मोठे योगदान आहे. अशा लोकांमुळेच गावाचा खरा विकास साधता येतो. या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्याबद्दल उपसरपंच इंद्रजित खराडे व जमीनदात्यांचे मनस्वी आभार.प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी