कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील सुरेखा अण्णासाहेब पाटील यांच्या घरातील कपाटातील लॉकरमधून चोरट्यांनी 7 लाख 80 हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना दि. 8 डिसेंबर रोजी पहाटे घडली.
याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात सुरेखा पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, कुची येथील विद्यानगर येथे सुरेखा पाटील यांचे घर आहे. त्या बाहेरगावी गेल्या होत्या. दि. 8 डिसेंबररोजी पहाटे ते 9 डिसेंबररोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटामधील लॉकरमधून 3 लाख 50 हजाराचे सोन्याचे गंठन, 2 लाखांचा दोन तोळ्यांचा लक्ष्मी हार, 1 लाखाचे सोन्याचे मिनी गंठण, 1 लाखाची सोन्याची अंगठी, तसेच 30 हजारांचा चांदीचा छल्ला, 14 नग चांदीची जोडवी तसेच 2 चांदीच्या आरत्या, असा सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.