सांगली : कृष्णामाई महोत्सवाचा शुक्रवारी शानदार प्रारंभ झाला. सकाळी धर्मध्वजारोहण मोठ्या उत्साहात व कृष्णामाईच्या जयघोषात झाले. सायंकाळी भव्य शोभायात्रा निघाली. कलशपूजन व कृष्णामाईस साडी-चोळी ओटी भरणे हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने झाला. कृष्णा नदीतिरावर सरकारी घाटावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात कृष्णामाई महोत्सव सुरू झाला.
श्री गणपती पंचायतन संस्थान, महानगरपालिका आणि श्री कृष्णामाई महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णामाई महोत्सवास प्रारंभ झाला. हा महोत्सव सहा दिवस आहे. शुक्रवारी सकाळी युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते धर्मध्वजारोहण समारंभ झाला. यावेळी गुरुनाथ महाराज कोटणीस, मनोहर सारडा, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. स्वाती शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे-पाटील, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, उपस्थित होते. निर्धार फौंडेशन, जिव्हाळा ग्रुपचे कार्यकर्ते सांगलीकर उपस्थित होते.