सांगली : पाणी म्हणजे जीवन आणि ज्या नदीतून ते वाहते, त्या नदीला माई (आई) मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत विविध कारणाने नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. ते रोखण्यासाठी व त्याबाबत जागृती करण्यासाठी अडीच वर्षापूर्वी चला जाणून घेऊया नदीला, हा उपक्रम शासनाने हाती घेतला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीची प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन आढावा घेण्याचे ठरले. मात्र गेल्या अडीच वर्षात या समितीच्या केवळ तीन बैठका झाल्या. आज (दि. 17) होणारी बैठकही स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, नदी प्रदूषणाबाबतची प्रशासनाची उदासीनता दिसून येत असून स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यांत याबाबत नाराजी आहे. कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी, त्यामुळे पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरित परिणाम होतो आहे. वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भू-पृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. कारखान्यांतील व शहर, गावांतील सांडपाणी नदीत थेट मिसळत आहे. त्यामुळे अनेकवेळा मासे तडफडून मरत आहेत. दूषित पाण्यामुळे विविध आजार वाढत आहेत.
या सर्व बाबींचा विचार करता, नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने चला जाणूया नदीला या अभियानाखाली उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी राज्यातील 75 नद्यांची निवड केली आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीसह इतर नद्यांचा समावेश आहे. अभियान राबवण्यासाठी शासनाने खास रकमेचीही तरतूद केली आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून वाहणार्या निवडक नद्यांबाबतची माहिती, तिचा प्रचार-प्रसार आणि त्यानुषंगिक बाबींसाठी साहाय्य करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समिती गठित करण्यात आली आहे. सहअध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वन विभाग, जलसंपदा, कृषी अशा विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी या समितीमध्ये आहेत. पहिल्या बैठकीत प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन मोहीम राबवण्याचे ठरले होते. मात्र गेल्या अडीच वर्षात केवळ तीन बैठका झाल्याचे स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकार्यांचे म्हणणे आहे.
काही दिवसापूर्वी बैठक घेण्यात आली. त्यावेळीही वेळ कमी असल्याने पुढील बैठकीत सविस्तर चर्चा करू, असे सांगण्यात आले. त्यानुसार आज ही बैठक होणार होती. मात्र ही बैठक स्थगित करण्यात आली आहे. याबाबत स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकार्यांत नाराजी आहे.