कृष्णा - वारणेच्या अस्तित्वावरच गदा! 
सांगली

Sangli News : कृष्णा - वारणेच्या अस्तित्वावरच गदा!

पाणी प्यायचे तरी कोणते? : माती उत्खननाने नदीकाठ खचू लागला

पुढारी वृत्तसेवा

मारुती पाटील

वाळवा तालुक्याला वरदाई ठरणार्‍या कृष्णा व वारणा नद्या सध्या जलप्रदूषण व अतिक्रमणांच्या विळख्यात आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी शासन स्तरावर फारसे प्रयत्न नाहीत. त्यामुळे भविष्यात प्रदूषणामुळे या नद्यांचे पाणी पिण्यासही योग्य राहणार नाही, अशी भीती आहे.

कृष्णा व वारणा नद्यांच्या मध्यभागी वसलेला वाळवा तालुका या नद्यांमुळे सुजलाम् सुफलाम् आहे. हजारो हेक्टर क्षेत्र या नद्यांमुळे ओलिताखाली आले आहे. मात्र सध्या या नद्यांना प्रदूषणाचा व अतिक्रमणांचा विळखा आहे. दोन्ही नद्यांना अनेक साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी तसेच औद्योगिक वसाहतीचे विषारी सांडपाणी, शहरी नाले येऊन मिसळतात. त्यामुळे नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वर्षाला या विषारी पाण्यामुळे लाखो मासे, जलचर मृत्युमुखी पडतात. त्यावेळी प्रदूषण महामंडळाकडून तात्पुरती जुजबी कारवाई केली जाते. त्यावर ठोस काही कारवाई होत नाही. नागरिकांनी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. प्रदूषणामुळे नदीचे पाणीही पिण्यास योग्य राहिलेले नाही.

वाळू माफिया गेले... माती माफिया आले...

काही वर्षांपूर्वी वाळू माफियांनी या दोन्ही नद्यांचे अक्षरशः लचके तोडले होते. बेसुमार वाळू उपशामुळे नदीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी नदीपात्रातून अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळेच महापुरावेळी नद्यांनी रौद्ररूप धारण केले. सध्या वाळू उपशावर बंदी असली तरी, नदीकाठावरील माती उत्खनन मात्र थांबलेले नाही. बेसुमार माती उत्खननामुळे अनेक ठिकाणी नदीकाठ खचू लागला आहे. त्यामुळे नदीकाठच्या जमिनींना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नदीने प्रवाहही बदलले आहेत. या सर्व बाबींकडे शासनाचे गांभीर्याने लक्ष नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT