दादासाहेब यमगर 
सांगली

कोसारी दुहेरी खून प्रकरण : अपहरण करून साक्षीदाराचाही केला खून?

कर्नाटकात मदभावी गावात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ/जत : कोसारी (ता. जत) येथील गाजलेल्या दुहेरी खून प्रकरणाला थरारक आणि संशयास्पद वळण मिळाले आहे. या खून प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार दादासाहेब नामदेव यमगर (वय 50) यांचा मृतदेह बुधवारी मदभावी (जि. बेळगाव, ता. अथणी, कर्नाटक) गावाच्या परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत असताना जतपासून 12 किलोमीटरवर मदभावी गावात त्यांचा मृतदेह मिळाला.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असताना त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झालेली आहे. यामुळे अपहरणानंतर दादासाहेब यांचा खून करून गळफासाचा बनाव रचल्याचा पोलिसांना संशय आहे.

जत तालुक्यातील कोसारी येथे 11 मार्च 2023 रोजी समाईक विहिरीच्या पाण्याच्या पाळीच्या वादातून विलास नामदेव यमगर (44) आणि प्रशांत दादासाहेब यमगर (24) या चुलते-पुतण्याची तलवार, चाकू आणि कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. यावेळी मध्यस्थीसाठी गेलेल्या दादासाहेब नामदेव यमगर, प्रवीण विलास यमगर, यशवंत भाऊसाहेब खटके यांच्यासह अन्य काही जणांना बेदम मारहाण केली होती. दादासाहेब मंगळवारी साक्ष देण्यासाठी सांगलीला जाणार होते. मंगळवारी गाडीत पेट्रोल टाकून येतो, असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते परतलेच नाहीत. नागज फाटा परिसरात ते शेवटचे दिसले होते. त्यांची दुचाकी अज्ञात व्यक्ती चालवत घेऊन गेल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांत बुधवारी सकाळी मदभावी येथे मृतदेह आढळून आला. जत आणि कवठेमहांकाळ पोलिसांचे पथक तातडीने मदभावी येथे दाखल झाले. अपहरणानंतर मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने हा खून करून आत्महत्येचा बनाव तर नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून अपहरण, खून आणि आत्महत्या या तिन्ही शक्यतांचा तपास सुरू आहे. कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणाशी असलेले धागेदोरेही तपासले जात आहेत.

कवठेमहांकाळ पोलिसांकडून चार संशयित ताब्यात

एक दिवस अगोदरच दाखल झालेला अपहरणाचा गुन्हा आणि त्यानंतर काही तासांत उघडकीस आलेला संशयास्पद मृत्यू यातील दुवा जोडला. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे आणि सहकारी संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत शोधमोहीम राबवत होते. तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक सूत्रांच्या माहितीच्या आधारे बुधवारी सायंकाळपर्यंत चार संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT