मिरज : कोरोना जाऊन पाच वर्षे लोटली, तरी बंद केलेल्या रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नाव काही रेल्वे घेताना दिसून येत नाही. प्रवाशांनी टाहो फोडला तरी त्याकडे कानाडोळा करण्याचे काम रेल्वेकडून केले जात आहे. पाच वर्षे लोटली तरी बंद केलेली कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस सुरू केलेली नाही. मार्गावरून रेल्वे गाड्याच धावणार नसल्याने, विद्युतीकरणासाठी रेल्वेने केलेला कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेल्यात जमा आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागांना जोडणारी कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस महत्त्वाची होती. तसेच रात्रीच्यावेळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून सोलापूर जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सोयीस्कर गाडी होती. ही एक्स्प्रेस कोल्हापूर येथून रात्री 11 वाजता सुटायची, मिरजेत मध्यरात्री 12 वाजता यायची व सोलापूर येथे पहाटे पोहोचायची. त्यामुळे या रेल्वेगाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता.
पण कोरोना काळात देशभरात अनेक रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. याचवेळी कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेसही बंद करण्यात आली. पण कोराना संपून आता पाच वर्षे लोटली तरी, ही गाडी सुरू करण्याचे नाव काही रेल्वे विभाग घेताना दिसत नाही. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील कनेक्टिव्हिटी जलद होण्यासाठी मिरज ते सोलापूर रेल्वेमार्गावर विद्युतीकरण करण्यात आले. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात आला. परंतु या मार्गावर गाड्याच धावत नसतील, तर त्या विद्युतीकरणाचा काय उपयोग, असा सवाल प्रवासी आणि प्रवासी संघटनांमधून व्यक्त केला जात आहे.
सुरू असणारी एक्स्प्रेस बंद करून या मार्गावर रात्रीच्यावेळी डेमू सुरू करण्यात आली आहे. थंडीच्या दिवसात डेमूने प्रवास करणे प्रवाशांना अत्यंत जिकिरीचे होत आहे. प्रवाशांचे थंडीने हाल होत आहेत. तसेच ही डेमू मिरज ते परळी धावत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून सोलापूरला रात्रीच्या वेळी जाण्यासाठी एकही एक्स्प्रेस गाडी नाही. तसेच मिरज-परळी डेमू ही पंढरपूर, कुर्डुवाडी मार्गे धावते. छोट्या छोट्या स्थानकांवरही या गाडीला थांबे असल्याने प्रवाशांचा प्रवासात बराच वेळ जात आहे. त्यामुळे कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मिरज रेल्वे कृती समितीने दिला आहे.
बंद केलेल्या रेल्वेगाड्या सुरू करा, रेल्वेगाड्यांचा विस्तार करावा, अशीही मागणी मध्य रेल्वेकडे वारंवार करण्यात येत आहे. परंतु मध्य रेल्वेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून रेल्वेने सोलापुरात जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेने तत्काळ कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस सुरू करण्याची गरज आहे.- राजेश कुकरेजा, मिरज रेल्वे कृती समिती सदस्य