Satej Patil 
सांगली

Shaktipeeth Highway| सरकार खाली खेचण्याची वेळ : आ. सतेज पाटील

शक्‍तिपीठ रद्दसाठी कामेरीत मेळावा; आधी लोकांची देणी द्या, मग विकासाच्या गप्पा मारा : आ. जयंत पाटील

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : फडणवीस सरकार सत्तेच्या जिवावर मस्ती करीत आहे. पण तुम्हाला सत्तेवर बसवलेला शेतकरी तुम्हाला आडवा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आम्हाला संघर्ष नवा नाही. जोपर्यंत शक्‍तिपीठ रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पेसे नाहीत, मग महामार्गाला एक लाख कोटी रुपये कोठून आणणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रस्तावीत शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, या मागणीसाठी कामेरी (ता. वाळवा) येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. माजी खा. राजू शेट्टी, आ. जयंत पाटील, माजी मंत्री आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, देवराज पाटील, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, अभिजित पाटील, डॉ. भारत पाटणकर, सभापती उदयसिंह पाटील, कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील, विजय पाटील, सी. बी. पाटील, पी. आर पाटील, सरपंच रणजित पाटील, अनिल पाटील, सुनील पाटील, शहाजी पाटील, दि. बा. पाटील आदी उपस्थित होते.

वाळवा तालुका शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील बाधित २६ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते. सरपंच रणजित पाटील यांनी स्वागत केले. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले

सतेज पाटील म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना शक्‍तिपीठ रद्द करण्याचा दिलेला शब्द पाळावा. ८६ हजार कोटींचा प्रकल्प एक लाखाच्या पुढे कसा गेला? ठेकेदार पोसण्यासाठीचा हा उद्योग आहे. सरकारला जास्त पैसे झाले असतील, तर त्यांनी छत्रपतींच्या किल्ल्यांची दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, लाडक्या बहिणींना पैसे द्यावेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील म्हणाले, विकासाला आमचा विरोध नाही. मात्र गरज नसणारा विकास कशासाठी हवा? शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा मार्ग जाहीर केला का? माझी सरकारला विनंती आहे, शेतकऱ्यांची मागणी नसताना हा मार्ग करण्यापेक्षा गावांना जोडणारे रस्ते, पाणंद रस्ते यावर निधी खर्च करावा. बाधित शेतींना भरपूर मदत मिळणार आहे, या अफवांना बळी न पडता शेतकऱ्यांनी महामार्ग रद्द होईपर्यंत आपला लढा चालू ठेवावा. सत्तेतील पक्षांनी, लोकप्रतिनिधींनी महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारला विनंती करायला हवी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT