कवठेमहांकाळ : दहशतवाद्यांच्या दोन गोळ्या मांडीत घुसल्या... रक्तबंबाळ झाला... सोबत असलेला सहकारीही छातीत गोळी लागल्याने गंभीर जखमी.. अशातच दहशतवाद्यांचा गोळीबारही सुरूच.. काय करावे सुचेना. मात्र त्याने सहकार्याला वाचवण्याचे ठरवले. दहशतवाद्याचा गोळीबार सुरू असतानाच जिवाची पर्वा न करता तो सहकार्याला खांद्यावर घेऊन डोंगरावरून खाली आला. वेळेत उपचार मिळाल्याने दोघेही सुखरूप बचावले.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी गावातील विनोद सुनील चव्हाण (वय 26) या जवानाने जीवाची पर्वा न करता स्वतःसह आपल्या सहकार्यालाही वाचवले. राष्ट्रीय रायफल्स, मराठा बटालियनच्या सेवेत असलेले विनोद सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहेत. किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा येथे संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत गुरुवार, दि. 22 रोजी एक जवान शहीद, तर दोन जवान जखमी झाले. त्यामध्ये कुकटोळी येथील विनोद चव्हाण हेही जखमी झाले होते. त्यांचे सहकारी उत्तरप्रदेशमधील प्रदीप कुमार हेही जखमी झाले, तर अकोला येथील संदीप पांडुरंग गायकर हे शहीद झाले.
गुरुवारी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास सिंगपोरा चतरू भागातील जंगल परिसरात डोंगरावर जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या तीन ते चार दहशतवाद्यांच्या गटाच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त सुरक्षा दलांनी या परिसरात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.
दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आणि ते पळून जाऊ नयेत, यासाठी घेराबंदी कडक करण्यात आली होती. डोंगरावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त पथक जवळ येताच हल्ला केला. लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. चकमक सुरू झाली. कारवाईदरम्यान विनोद यांने दहशतवाद्यांवर 48 गोळ्या झाडल्या. या चकमकीत विनोदलाही मांडीत दोन गोळ्या लागल्या, तर प्रदीपकुमार यांना छातीत एक गोळी लागली. गायकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. विनोद व प्रदीपकुमार यांच्यावर जम्मू काश्मीरमधील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून दोघेही सुखरूप आहेत.