कवठेमहांकाळ : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे बिरोबा बनामध्ये भक्त कुणाचे, या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत एकावर चाकूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 एप्रिलरोजी सकाळी 11 वाजता आरेवाडी येथील बिरोबा मंदिर ट्रस्टच्या कार्यालयासमोर घडली. याबाबत शिवाजी शहाजी कोळेकर (वय 30, रा. आरेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी कोळेकर हे उद्दनवाडी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील भक्तांची पावती काढण्यासाठी कार्यालयात गेले होते. यावेळी अनिल आप्पा कोळेकर, शहाजी दादासाहेब कोळेकर, सुबराव तातोबा कोळेकर आणि रामा कोळेकर (सर्व रा. आरेवाडी) यांनी ‘उद्दनवाडीचे भक्त आमचे आहेत, तुमचा त्यांच्याशी संबंध नाही’, असा दावा करत वाद सुरू केला. ‘उद्दनवाडी गाव पूर्ण आमचे आहे, तिथे तुमचे भक्त नाहीत. तुम्हाला भक्तांचा नैवेद्यही देवाला दाखवू देणार नाही’, अशा शब्दांत संशयितांनी शिवाजी कोळेकर यांना धमकावले. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले.
यादरम्यान अनिल कोळेकर याने खिशातून चाकू काढून शिवाजी कोळेकर यांच्या उजव्या मांडीवर वार केला. यावेळी चाकू पोटाला लागल्याने कोळेकर जखमी झाले. त्यानंतर चौघांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत दमदाटी केली. गंभीर जखमी झालेल्या शिवाजी कोळेकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांनी अनिल आप्पा कोळेकर, शहाजी दादासाहेब कोळेकर, सुबराव तातोबा कोळेकर आणि रामा कोळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज पाटील अधिक तपास करत आहेत.