रामानंदनगर : जेसीबीच्या साह्याने बापूवाडी झोपडपट्टी उद्ध्वस्त करताना रेल्वे प्रशासन.  (छाया : तुकाराम धायगुडे)
सांगली

70 वर्षांची बापूवाडी झोपडपट्टी जमीनदोस्त

रामानंदनगरमध्ये रेल्वे प्रशासनाची कारवाई : पोलिसांचा चोख बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

पलूस : किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकाजवळील रामानंदनगर येथील बापूवाडी झोपडपट्टीवर रेल्वे प्रशासनाने जेसीबी चालवत 70 वर्षांचा संसार काही तासांत जमीनदोस्त केला. महिलांचे रडणे, लहान मुलांचे भयभीत डोळे आणि वृद्धांच्या हातात सापडेल ते संसार उपयोगी साहित्य हे चित्र काळीज पिळवटून टाकणारे होते.

इराणी आणि डवरी समाजातील सुमारे 200 नागरिक गेली सात दशके या जागेवर राहत होते. परंतु रेल्वेच्या भूमीवर अतिक्रमण झाल्याच्या कारणावरून 6 मेरोजी रात्री प्रशासनाने नोटीस देत 24 तासांत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले. सकाळी 10 वाजता तीन जेसीबी, रेल्वे व स्थानिक पोलीस ताफ्यासह रेल्वे प्रशासन दाखल झाले आणि आक्रोश, विनवण्या, आंदोलने झुगारून देत झोपडपट्टीवर जेसीबी चालवण्यात आली.

भाजपचे अमीर पठाण यांनी कारवाईला विरोध केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. सूर्यजित चव्हाण यांनी कारवाई थांबवण्याची विनंती करत कोर्टाचे आदेश मागितले, पण प्रशासनाने ते दाखवले नाहीत. झोपडपट्टी उद्ध्वस्त केल्यानंतर तेथील नागरिकांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केले.

या कारवाईत मिरज रेल्वे सहाय्यक अभियंता सरोज कुमार, अनुभाग अभियंता वीरेंद्र कुमार, पुणे सहाय्यक सुरक्षा आयुक्त पी.के.दास, मिरज रेल सुरक्षा बल महेंद्र पाल, मिरज रेल्वे पोलिस निरीक्षक संभाजी काळे, पलूस पोलिस निरीक्षक संदीप पाटील व जवळपास 100 पोलिसांनी सहभाग घेतला. कारवाईवेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बापूवाडी झोपडपट्टी जागा पूर्णपणे रेल्वेच्या हद्दीत नाही आणि प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही पुनर्वसनाशिवाय अचानक केलेली ही कारवाई अमानवी आहे. सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी झोपडपट्टीतील नागरिकांसोबत रस्त्यावरील लढाई लढणार आहे.
अमीर पठाण, सामाजिक कार्यकर्ते
रेल्वे विभागाने चुकीची कारवाई केली आहे. त्यांनी 24 तासांचा अवधी असताना 12 तासांत कारवाई सुरू केली. त्यांच्याकडे झोपडीपट्टी जेसीबीने हटविण्याचा कोणताही निकाल नव्हता. त्यामुळे कारवाई बेकायदेशीर आहे. झोपडपट्टीतील नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढा देणार आहोत.
अ‍ॅड. सूर्यजित चव्हाण, मुंबई उच्च न्यायालय
झोपडपट्टी कारवाई वेळी रेल्वे प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. या नागरिकांना राहण्यासाठी शासनाकडून जागा मिळावी, यासाठी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे मागणी करणार आहे.
प्रशांत नलावडे, माजी सरपंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT