Sangali news 
सांगली

Sangali news | विट्यात किंग कोब्रा अर्थात अतिविषारी नागाला दिले जीवदान

वन्यजीव रक्षक टीम महाराष्ट्राने सलग ८ दिवस त्या नागास दवाखान्यात नेऊन उपचार केले.

पुढारी वृत्तसेवा

विटा : विजय लाळे

अतिविषारी म्हणून माहीर असलेल्या किंग कोब्रा अर्थात नागाला मरणाच्या दाढेतून वाचवून जीवदान दिले. विट्यात ही घटना समोर आली. येथील एका सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र असलेल्या युवकाने वनविभागाच्या मदतीने हे पुण्याचे काम केले.

गेल्या आठवड्यात १२ जानेवारी रोजी सोम वारी रात्री १० वाजता विटा साळशिंगे रस्त्यावरील मंगल जगताप यांच्या घरी लोखंडी गेट खाली एक साप अडकल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र विवेक भिंगारदेवे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ टीमचे सहकारी ओम सुतार यांना घटनास्थळी पाठवले. सुतार यांनी पाहिले की, गेटखाली अडकून किंग कोब्रा अर्थात अतिविषारी जातीचा नाग गंभीर जखमी झाला आहे. लगेचच विवेक भिंगारदेवे स्वतः घटनास्थळी गेले. त्यांनी जखमी नागाला विट्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले.

तसेच याबाबत खानापूर वनविभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर विलास पावळे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाने वन विभागाचे अधिकृत पत्र घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश लवटे यांच्याकडे त्यांनी त्या नागाला नेले. यानंतर विवेक भिंगारदेवे, डॉ. लवटे आणि टीमने तब्बल २ तास शस्त्रक्रिया करून नागावर उपचार सुरू केले.यानंतर डॉ. लवटे यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा उपचारासाठी दवाखान्यात घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर वन्यजीव रक्षक टीम महाराष्ट्राने सलग ८ दिवस त्या नागास दवाखान्यात नेऊन उपचार केले.

परवा सोमवारी डॉ. निलेश लवटे यांनी नाग आता पूर्ण बरा झाला असून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास योग्य असल्याचे सांगितले. त्यानंतर विवेक भिंगारदेवे, ओंकार कोळी, ओम सुतार, अख्तर शिकलगार, सोहेब शिकलगार तसेच रेंज फ़ॉरेस्ट ऑफिसर विलास पावळे, वनरक्षक अशोक खापरकर, तौसिफ काझी यांच्या संयुक्त प्रयत्नाने त्या नागाला सुखरूप जंगलात सोडले. या घटनेमुळे विवेक भिंगारदेवे आणि वन्य जीव रक्षक टीमचे मोठे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT