सांगली : नेहमी आईच्या कुशीत लुडबूड करणार्या साहिलचे अपहरण झाले अन् सार्यांचे धाबे दणाणले. परंतु युध्दपातळीवर यंत्रणा राबवून अपहरण झालेल्या साहिलची सुखरूपपणे सुटका करण्यात सांगली पोलिसांना यश आले. चार दिवसानंतर बाळाला आईने कुशीत घेतल्यानंतर सर्वांचेच डोळे पाणावले.
दरम्यान, साहिल याच्या अपहरणप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, दोघे फरार झाले आहेत. इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज (वय 43, रा. किल्ला भाग, मिरज) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे, तर इम्तियाज पठाण आणि वसीमा इम्तियाज पठाण हे दोघे फरार झाले आहेत.
याबाबत माहिती अशी, फुगे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील कनवास येथील बागरी कुटुंबीय सांगलीत आले आहे. विश्रामबाग चौकात फुगे विकून हे कुटुंब उदरनिर्वाह चालवते. ऐन दिवाळीत दि. 20 रोजी मध्यरात्री या कुटुंबातील एक वर्षाचा साहिल आईजवळ झोपलेला असताना तिघा संशयितांनी त्याचे अपहरण केले. हा प्रकार लक्षात येताच बागडी कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले. नेहमी गजबजलेल्या विश्रामबाग चौकातूनच बालकाचे अपहरण झाल्याने पोलिसदेखील चक्रावले. यानंतर तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी अपहरण झालेल्या बालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांची पथके तपासासाठी रवाना करण्यात आली.
याच दरम्यान सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणला अपहरण प्रकरणात सामील असणार्या संशयितांची टीप लागली. मिरजेतील इनायत गोलंदाज याने इम्तियाज पठाण आणि वसीमा पठाण यांच्या मदतीने या बालकाचे अपहरण केल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मिरजेतील किल्ला भागात छापा टाकून गोलंदाज याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बालकाचे अपहरण केल्याची कबुली दिली. तसेच हे बालक रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके तातडीने रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डेकडे रवाना झाली. पथकाने सावर्डेतील सचिन राजेशिर्के याच्या घरात छापा टाकून बालकाची सुखरूप सुटका केली.
दरम्यान, रत्नागिरीतील सावर्डे गावातील राजेशिर्के दाम्पत्यास मूलबाळ नव्हते. त्यांना सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच मूल दत्तक हवे होते. इम्तियाज पठाण आणि वसीमा पठाण या दोघांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बाळ दत्तक देऊ, असे त्यांना आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून रक्कमदेखील उकळली होती.
राजेशिर्के यांना बाळ देण्यासाठी तिघांनी बागडी कुटुंबातील बालक चोरण्याचा कट रचला. त्यानंतर ऐन दिवाळीत बालकाचे अपहरण करून राजेशिर्के यांना विकण्यात आले. परंतु दिवाळीनंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू, असे आश्वासन देऊन संशयितांनी पलायन केले. परंतु अवघ्या चार दिवसात सांगली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत अपहरण झालेल्या बालकाची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी एकास अटक केली असून अन्य दोघे फरार आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके त्यांच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, चार दिवसानंतर आपल्या बालकाला पाहिल्यानंतर साहिलच्या आईच्या अश्रूंचा बांधच फुटला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्याहस्ते साहिल याला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले.
सांगलीतील विश्रामबागसारख्या गजबजलेल्या चौकातून बालकाचे अपहरण झाल्यानंतर सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. पोलिसांनी रात्रीचा दिवस करत या प्रकरणाचा छडा लावला. काही पथके रात्रं-दिवस संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आली होती.
रत्नागिरीतील सावर्डे गावातील राजेशिर्के या दाम्पत्याला अपत्य नसल्याने त्यांनी मूल दत्तक घेण्यासाठी चाचपणी सुरू केली होती. यादरम्यान वसीमा पठाण त्यांच्या संपर्कात आली आणि तिने या दाम्पत्याला बाळ देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर साहिल याचे अपहरण करण्यात आले.
इनायत गोलंदाज व अन्य दोघांनी या बालकाचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्यांनी इतर कोणत्या बालकाचे अपहरण करून त्याची विक्री केली आहे का? याचादेखील तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयातून अर्भकाची चोरी झाली होती. त्यानंतर आता एक वर्षाच्या बालकाचे अपहरण झाले. त्यामुळे सांगली जिल्ह्यात बाळांची चोरी करणारे रॅकेट सक्रिय आहे का? याचादेखील तपास केला जात आहे.