Kharsundi Siddhanath Temple Pudhari
सांगली

Kharsundi Siddhanath Temple : खरसुंडीत सिद्धनाथ मंदिरातील ‌‘चांदी प्रकरण‌’ तापले

आंदोलनाचा इशारा, ट्रस्टचा खुलासा आणि गुरव समाजाची भूमिका; चौकशीकडे भाविकांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी ः खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील चांदीच्या खांबांवरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी आंदोलनाचा इशारा, देवस्थान ट्रस्टचा खुलासा आणि गुरव समाजाची भूमिका, यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. सध्या धर्मादाय विभाग व पोलिस प्रशासनाकडून सुरू असलेल्या चौकशीकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सन 2012 ते 2016 या कालावधीत ट्रस्टने जाणीवपूर्वक लेखापरीक्षण केले नसल्याचा आणि मंदिरातील सहा खांबांवरील सुमारे 100 किलो चांदी परस्पर गायब केल्याचा आरोप खरात यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास 15 मेपासून धर्मादाय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दुसरीकडे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रस्टने 1994 ते 2025 पर्यंतचे सर्व लेखापरीक्षण अहवाल धर्मादाय कार्यालयाकडे सादर केल्याचा दावा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. मंदिरातील अष्टकोनी खांबांवरील चांदी जीर्ण झाल्यामुळे ती दुरुस्तीसाठी अधिकृत पंचनामा व ठराव करून काढण्यात आली असून, त्यावर नव्याने नक्षीकाम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाकूड उपलब्ध न झाल्याने कामास विलंब झाला असून चौकशीपूर्वी आंदोलन करणे म्हणजे संस्थेची बदनामी असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.

दरम्यान, भाविक शिवाजीराव पाटील यांनी 25 वर्षांपूर्वी अर्पण केलेली 24 किलो चांदी गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रस्टकडे जाब विचारला होता. मात्र, अद्याप काम पूर्ण न झाल्याने त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि खानापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष शेखर निचळ, डॉ. कैलास पाटील यांच्यासह विविध संघटनांनी या प्रकरणात उडी घेतल्याने खरसुंडीतील हे चांदी प्रकरण आता अधिकच गाजू लागले आहे.

श्रीपूजकांची बदनामी नको

या वादात आता स्थानिक श्रीपूजक गुरव समाजानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देवस्थान ट्रस्ट आणि पुजारी व्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा असून, ट्रस्टच्या कारभारामुळे गुरव समाजाला नाहक बदनाम केले जात असल्याचे समाजाने पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT