आटपाडी : खरसुंडी ता. आटपाडी येथे चैत्र यात्रेनिमित्त खिलार जनावरांची यात्रा घाणंद घरनिंकी रस्त्यावरच भरवण्याचा निर्णय प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
खरसुंडी येथे चैत्र महिन्यात निमित्ताने भरणारा जातीवंत खिलार जनावरांचा बाजार महाराष्ट्र , कर्नाटक व आंध्रप्रदेश प्रदेश या तिन्ही राज्यात प्रसिद्ध आहे. जुने यात्रा तळ संपुष्टात आले आहे. गावाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे यात्रातळाची मोठी अडचण निर्माण होत आहे.
मागील काही वर्षात पौष यात्रा भिवघाट रस्त्यावर वीज मंडळाचे परिसरात तर चैत्र यात्रा घाणंद-घरनिंकी रस्त्यावर भरवली जात आहे. यंदा २३ पासून खिलार जनावरांचा बाजार भरणार आहे. गतवर्षी प्रमाणेशेतकऱ्यांनी घाणंद घरनिंकी रस्त्यावर जनावरांसाठी गेल्या महिन्या पासून जागा निश्चित केल्या आहेत.
दरम्यान गेल्या दोन चार दिवसात ही यात्रा नेलकरंजी रोडवर भरवण्यात यावी अशी खरसुंडी ग्रामस्थानी मागणी केली होती.त्यामुळे यात्रेबाबत शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण होत होता.
बैठकीत जनावरांच्या बाजाराबाबत आढावा घेण्यात आला. जागा निश्चित केल्याचे जाहीर करण्यात आले. बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी यात्रातळावर देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. सभापती संतोष पुजारी यांनी यात्रातळावर ग्रामपंचायत कडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या खरसुंडी यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. हा जनावरांचा बाजार टिकवून ठेवण्यासाठी बाजार समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज आहे. गावाचा विस्तार वाढत चालला. पण शेतीसाठी, शर्यतीसाठी उपयुक्त ठरणारी,जनावरे खरेदी विक्री होणाऱ्या यात्रेला हक्काची जागा पाहिजे. त्यासाठी कायम स्वरूपी बाजारतळ अधिग्रहण करण्याची आवश्यकता आहे.