गार्डी (ता. खानापूर) येथील सीताफळाच्या बागेत पाणी साचले आहे.  
सांगली

Sangli Rain : गारपिटीचा दणका; फळपिकांना फटका

खानापूर तालुक्यात गारपीट; आंबा, सीताफळ पिकांना फटका

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः सांगली जिल्ह्याला गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले. खानापूर तालुक्याच्या उत्तर भागात झालेल्या जोरदार गारपिटीमुळे आंबा आणि सीताफळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे, तर पलूस आणि शिराळा परिसरात गहू, द्राक्षे आणि मका पिकांना निसर्गाच्या कोपाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खानापूर तालुक्यात गारांचा खच

विटा ः खानापूर तालुक्याच्या उत्तर भागात दुपारी सव्वातीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपिटीला सुरुवात झाली. गार्डी, घानवड, नागेवाडी, चिखलहोळ या सीताफळ आणि आंबा उत्पादक पट्ट्यात गारांचा मोठा तडाखा बसला. यामुळे झाडांवरील कच्च्या कैऱ्या जमिनीवर पडल्या असून बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. विटा शहरात सुमारे दीड तास पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साठले होते. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने वीज व्यवस्था काही काळ कोलमडली होती. पावसामुळे ऊस पिकाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

पलूसमध्ये द्राक्ष उत्पादक चिंतेत

पलूस ः पलूस, कुंडल, दुधोंडी, भिलवडी, आमणापूर आणि अंकलखोप परिसरात विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. सध्या कापणीच्या टप्प्यात असलेल्या गहू पिकाचे यामुळे नुकसान होणार आहे. द्राक्ष बागायतदार आणि बेदाणा तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला असून, द्राक्ष मणी फुटण्याची भीती आहे.

कडेगाव पूर्व भागात धुवाधार पाऊस

नेवरी ः नेवरीसह कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील भिकवडी खुर्द, येतगाव, कान्हरवाडी, कोतीज, उमरकांचन परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. ओढे-नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आंब्यांचा सडा पाहायला मिळाला.

शिराळा तालुक्यात रब्बी धोक्यात

शिराळा ः शिराळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. जांभळेवाडी आणि कांदे परिसरात वाऱ्यामुळे मका पीक आडवे झाले आहे, तर झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रब्बी पिकांची काढणी आणि मळणीची कामे सुरू असतानाच पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT