विटा : द्राक्ष औषध अंश तपासणी प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र खानापूर तालुक्यात लवकरच उभारणार आहे, अशी घोषणा आमदार सुहास बाबर यांनी गुरूवारी (दि.१८) केली. येथील दि खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यांत संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार सुहास बाबर उपाध्यक्ष सदाशिव हसबे, आनंद राव पाटील, भरत लेंगरे, राजू मुल्ला, गणपत राव भोसले, कृष्णदेव शिंदे, संजय मोहिते, सयाजी धनवडे, नामदेव चव्हाण, गगांधर लकडे, गजानन दिवटे, सुनिल पाटील, सुशांत देवकर आदी प्रमुख उपस्थित होते.
या सभेत या खरेदी-विक्री संघाचे नाव आमदार अनिल बाबर खानापूर तालुका खरेदी विक्री संघ करण्याचा ठराव पारित करण्यात आला. यावेळी आमदार बाबर म्हणाले, आज या संस्थेला अनिल भाऊंचे नाव देताना एका डोळ्यात आसू तर दुसऱ्यात हसू आहे. ज्या शेतकऱ्यांनी भाऊंवर मनापासून प्रेम केले, त्यांच्या ऋणातून उतराई होणे कठीण आहे. भाऊंनी टेंभूचे पाणी आणून या भागाचे नंदनवन करण्याचे स्वप्न बघितले आणि प्रत्यक्षात आणले. इतके मोठे काम कदाचित आपल्या हातून होणार नाही. मात्र पाणी आल्या नंतर होणारा बदल लक्षात घेऊन मतदारसंघा च्या विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. त्यादृष्टीने तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष, डाळींब आणि विविध फळांची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. यात द्राक्ष निर्यातीसाठी औषधांचा अंश तपासणी गरजेची असते. अशी प्रयोगशाळा विट्यात कृषि विभागाच्या जागेवर उभारू. त्याचबरोबर ज्या घाटमाथ्यावरून निर्यातक्षम द्राक्षांचा दर ठरविला जातो, तिथे द्राक्ष संशोधन केंद्र उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. महामार्गाचे जाळे आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विणले आहे. आता विविध उद्योग उभाण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत, असे सांगत मतदारसंघात पाणी आल्यानंतर खरेदी विक्री संघाची उलाढाल वाढली आहे. शेतकरी हित लक्षात घेऊन या संघाने आता आळसंदमध्येही शाखा उभारावी, असे आवाहनही आमदार बाबर यांनी केले.
प्रारंभी हेमंत बाबर यांनी अहवाल वाचन करताना संघाला गत आर्थिक वर्षात ८२ लाख ४९ हजार नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. महेश घोरपडे यांनी आभार मानले. रामचंद्र भिंगारदेवे यांनी सूत्रसंचालन केले. तर सामाजिक कार्यकर्ते देवदत्त राजोपाध्ये आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.