सांगली जिल्हा परिषद  
सांगली

Sangli News : कवठेपिरान गटात ‘तिच्या’साठी लॉबिंग सुरू

नामाप्र महिला आरक्षणामुळे इच्छुकांची संख्या मर्यादित ः नेतेमंडळींनी घेतली ‘वेट अँड वॉच’ची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

संजय खंबाळे

कवठेपिरान ः मिरज तालुक्यातील कवठेपिरान जिल्हा परिषद गट नामाप्र महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे ‘तिच्या’ उमेदवारीसाठी ‘त्यांनी’ देव पाण्यात घातले आहेत. आपल्या सौभाग्यवतीला उमेदवारी मिळण्यासाठी नेतेमंडळींकडे लॉबिंग सुरू केले आहे. मात्र अजून विविध नावांची चर्चाच सुरू आहे. नेतेमंडळींनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

एकेकाळी मिरज पश्चिम भाग हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने काबीज केला. आमदार जयंत पाटील यांनी विविध विकास कामांसाठी निधी देत कार्यकर्त्यांची फौज या भागात तयारी केली. दुसर्‍या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीपासून या भागातील लोकांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठबळ दिले. काही ग्रामपंचायतींमध्ये स्वाभिमानीचा झेंडा फ डकविला. काही वर्षात हा सारा परिसर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्लाच बनला आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करून संघटनेची जिल्ह्यात एकमेव जागा या गटात विजयी झाली होती. त्यामुळे स्वाभिमानीकडून उमेदवारीची माळ कोणाच्या गळात पडते याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

कवठेपिरान जिल्हा पारिषद गटामध्ये सध्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पै. भीमराव माने यांच्या पत्नी कवठेपिरानच्या सरपंच अनिता माने, उद्योजक सचिन पाटील यांच्या पत्नी मीना पाटील, उद्योजक अरुण कोरे यांच्या पत्नी दीपाली कोरे या नावांची चर्चा आहे.

माने यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भीमराव माने यांनी रयत क्रांती संघटनेला रामराम केला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आष्ट्यातील कार्यक्रमात माने भाजपात आल्याचे जाहीर केले. तसेच त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले. मात्र अजूनही हा पक्षप्रवेश झाला नाही. तसेच राष्ट्रवादीकडून यांच्या पत्नीला उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. मात्र माने यांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. त्यांच्या निर्णयानंतर राजकीय हालचाली गतीमान होणार आहेत.

कवठेपिरान पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी चार-पाच वर्षांत चांगली तयारी केली. मात्र हा गण नामाप्र प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे सर्व पक्षांतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. या गणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार गट) अ‍ॅड. अरविंद सपकाळ इच्छुक आहेत, तर आघाडीतून माजी सभापती अनिल आमटवणे यांच्याही नावाची चर्चा आहे. दुधगाव पंचायत समिती गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. मात्र कोणत्याच पक्षाकडून इच्छुकांची नावे समोर आली नाहीत. नेत्यांनी आणि स्थानिक पदाधिकार्‍यांकडून चाचपणी सुरू आहे. मात्र अजूनही याठिकाणी ‘सब शांती शांती है’, अशी अवस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गेल्या सात-आठ वर्षांत या गटात बस्तान बसविले आहे. कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांनी आपला स्वतंत्र गट अस्तित्वात आणला आहे. त्यामुळे त्यांचीही भूमिका काय असणार, याबाबत उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT