Water Crisis Pudhari File Photo
सांगली

Sangli News| कवठेमहांकाळ पूर्व भागावर दुष्काळाच्या झळा

चारा, पाण्यासाठी जनावरांची रानोमाळ भटकंती सुरू

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल नलवडे

नागज : कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. पाण्याअभावी बागायती पिके तसेच पशुधन संकटात आहे. खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस नसल्याने बहुतांशी भागात खरिपाची पेरणी झाली नाही. पावसाअभावी विहिरी व कूपनलिका आटल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. चारा-पाण्याविना जनावरांचे हाल सुरू आहेत. यंदा कमी पावसाने निम्म्याहून अधिक क्षेत्रातील खरिपाच्या पेरण्या झाल्याच नाहीत. पण पेरणी झालेली पिकेही पाण्याअभावी वाळून गेली. कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागातील ढालगाव, चोरोची, चुडेखिंडी, जांभुळवाडी, ढोलेवाडी, दुधेभावी, शिंदेवाडी, घोरपडी, निमज, नागज, रायवाडी, केरेवाडी, शेळकेवाडी, आगळगाव, आरेवाडी, लंगरपेठ, ढालेवाडी, इरळी भागात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. थोड्याफार पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पण ही पिके पाण्याअभावी वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. म्हैसाळ व टेंभू योजनेच्या पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी वाढवलेली बागायती पिकेही धोक्यात आहेत. विजेचा खेळखंडोबा आणि सिंचन योजनांच्या पाण्याचा अनियमितपणा यामुळे बागायती पिके जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

पाण्याअभावी जनावरांचे हाल सुरू आहेत. शेळ्या-मेंढ्यांना चारा नसल्याने चाऱ्याच्या शोधात त्यांची आतापासूनच रानोमाळ भटकंती सुरू आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असल्याचे चित्र दिसत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार असला तरी, दुष्काळाने होरपळलेल्या इथल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच याबाबत तातडीने शासनस्तरावर निर्णय घेण्याची मागणी होऊ लागली आहे.

दुष्काळाचे चित्र विदारक बनत चालल्याने या भागाला वरदान ठरणारे दुधेभावी, लंगरपेठ आणि बसाप्पाचीवाडी तलाव सिंचन योजनेच्या पाण्याने भरून घेण्याची आवश्यकता आहे. श्रेयवादाच्या राजकारणात स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या इथल्या राजकारण्यांना दुष्काळग्रस्तांची आस्था वाटणार की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होईल, तशी प्रतिक्रिया देखील उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT