तासगाव : शोभेची दारू तयार करताना दारूचा स्फोट होऊन आठजण जखमी झाले. त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. शोभेच्या दारू निर्मितीसाठी प्रसिद्ध कवठेएकंद (ता. तासगाव) येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दसर्यानिमित्त दारू निर्मिती सुरू होती.
जखमींची नावे अशी ः आशुतोष बाळासाहेब पाटील (वय 16), आनंद नारायण यादव (55), गजानन शिवाजी यादव (29), अंकुश शामराव घोडके (21), प्रणव गोविंद आराध्ये (21), ओमकार रवींद्र सुतार (21) व सौरभ सुहास कुलकर्णी (27, सर्व रा, कवठेएकंद ) विवेक आनंदराव पाटील (38, रा. तासगाव). यातील आशुतोष व आनंद यांची प्रकृती गंभीर आहे. कवठेएकंदचे ग्रामदैवत श्री बिर्हाडसिद्ध देवाची यात्रा दसर्यादिवशी असते. या रात्री गावप्रदक्षिणा घालण्यासाठी पालखी निघते. पालखीसमोर शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. ही परंपरा गावातील लोकांनी जपली आहे.
दसरा चार दिवसावर येऊन ठेपल्याने प्रत्येक गल्लीतील तरुण मुले शोभेची दारू निर्मिती करण्यात गुंतली आहेत. येथील ब्राह्मण गल्लीतील एका मंडळाकडून एका समाजाच्या सांस्कृतिक सभागृहात दारू निर्मिती सुरू होती. अत्यंत स्फोटक व ज्वलनशील असलेली दारू लाकडी दांडक्यात भरत असताना स्फोट झाला. स्फोट होताच छतावर असणारे पत्रे उडाले. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. जखमींना सांगली व मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. स्फोट नेमका कुणामुळे व कोणत्या कारणांनी झाला, याची माहिती लगेचच समजू शकली नाही, कारण जखमींवर उपचार सुरू आहेत. अनुभवी लोकांच्यामते, दारू लाकडी दांडक्यात भरत असताना स्फोट झाला असण्याची शक्यता मोठी आहे. पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
सन 2000 नंतर शोभेची दारू स्फोटाच्या घटना घडल्या आहेत, त्यात 42 वर बळी गेले आहेत. अनेक तरुण जायबंदी, तर काही जण कायमचे दुबळे झाले आहेत.
दारू निर्मिती सुरू असलेली जागा ही सार्वजनिक मालकीची आहे. वास्तविक ग्रामपंचायतीने या सार्वजनिक जागेवर दारू निर्मितीवर बंदी घालायला हवी होती.
काही वर्षांपूर्वी मोजक्या मंडळाकडून शोभेच्या दारूची निर्मिती केली जात असे. मंडळांत चुरस निर्माण झाली. अनेक तरुण केवळ गल्लीतील ईर्षेपोटी या कामात उतरले. परिणामी पंधरा वर्षांच्या काळात दारू निर्मितीचे स्वरूप मोठे झाले. दारू निर्मितीत अनेक अनुभवशून्य तरुणांचा भरणा होऊ लागला आणि त्यातून अशा दुर्घटना वाढू लागल्या.