पाणीपुरवठा File Photo
सांगली

Sangli News| कवठेमहांकाळला पाणी मिळणार तरी कधी?

६० कोटींच्‍या बंडगरवाडी योजनेला विलंबामुळे नागरिकांची प्रतीक्षा कायम

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ६० कोटी १० लाख रुपये खर्चाची बंडगरवाडी पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. या कामाची वर्कऑर्डर २०२३ मध्ये देण्यात आली असून, तेव्हापासून काम सुरू आहे. मात्र, योजनेला विलंब झाल्याने शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न अद्याप कायम आहे. नगराध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, योजनेचे काम पूर्ण झाले असून, पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वीच्या चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे शहरवासीयांना प्रत्यक्ष पाणी मिळण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कवठेमहांकाळ शहराचा विस्तार वेगाने होत असून, वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. सध्या शहराचा पाणीपुरवठा प्रामुख्याने म्हैसाळ योजनेवर अवलंबून आहे. या योजनेच्या पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास शहरासमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहू शकते. ही बाब लक्षात घेऊन बंडगरवाडी तलावातून पाणी आणण्याची पर्यायी योजना हाती घेण्यात आली.

काही वर्षांपूर्वी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद झाल्यानंतर झुरेवाडी, हिंगणगाव आणि कवठेमहांकाळ येथील विहिरींतून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, या विहिरींतील पाणीसाठाही कमी झाल्याने नागरिकांना तीन ते चार दिवसांच्या अंतराने पाणी मिळत आहे. वाढती उपनगरे आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बंडगरवाडी योजनेतून नियमित पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे.

योजनेच्या कामाला झालेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. मोठा निधी खर्च करूनही शहराला अद्याप योजनेचे पाणी मिळत नसल्याने कामाच्या प्रगतीबाबत आणि विलंबाच्या कारणांबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.

काही दिवसात पाणीपुरवठा सुरू होईल : शिंदे

बंडगरवाडी पाणीपुरवठा योजनेच्या कामातील विलंबाची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. आता योजनेचे काम पूर्ण झाले असून, पाणीपुरवठ्यापूर्वीच्या चाचण्या सुरू आहेत. चाचणीदरम्यान काही ठिकाणी गळती आणि तांत्रिक अडचणी आढळल्या असून, त्या दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. सर्व चाचण्या पूर्ण करून आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर काही दिवसांत शहराला सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांनी काही दिवस सहकार्य करावे, असे कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शुभांगी शिंदे यांनी सांगितले.

विलंबाची जबाबदारी निश्चित करा : महेश पाटील

६० कोटी १० लाख रुपये खर्चाच्या बंडगरवाडी पाणीपुरवठा योजनेची वर्कऑर्डर २०२३ मध्ये देण्यात आली. मात्र, कामाला विलंब झाल्याने नागरिकांना अद्याप योजनेचे पाणी मिळालेले नाही. या दिरंगाईबाबत प्रशासनाने खुलासा करावा. ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही, याचेही उत्तर मिळायला हवे. नागरिकांना आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष पाणी हवे आहे. विलंबाची जबाबदारी निश्चित करून योजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते महेश पाटील यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT