‘म्हैसाळ‌’च्या कालव्यात पाणी, पण अग्रणी पात्र कोरडेच 
सांगली

Kavathe Mahankal : ‘म्हैसाळ‌’च्या कालव्यात पाणी, पण अग्रणी पात्र कोरडेच

पिण्याच्या पाणीपुरवठा योजना ठप्प; भीषण पाणीटंचाईचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ तालुक्यात उन्हाळ्याची सुरुवात होताच पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अग्रणी नदीपात्रातील सर्व बंधारे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. परिणामी, या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा विहिरींनीही तळ गाठला आहे. अनेक गावांतील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हैसाळ योजनेतून नदीपात्रात पाणी सोडल्याने परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात राहते. यावर्षी अद्याप पाणी न सोडल्यानेच गंभीर परिस्थिती ओढावली आहे. अनेक गावांमध्ये दोन दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. मळणगाव, शिरढोण, तिरमलवाडी, मोरगाव, हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, धुळगाव आणि रांजणी भागांतील बंधारे स्थानिक पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे मुख्य स्रोत मानले जातात. या बंधाऱ्यांमध्ये आता पाण्याचा ठावठिकाणा नाही.

मळणगाव परिसरातील तीनही बंधाऱ्यांमध्ये एकेकाळी सरासरी 5 ते 6 दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असली तरी सध्या ते कोरडे पडले आहेत. शिरढोण येथील मोठ्या क्षमतेचे बंधारेही आता पाण्याविना उघडे पडले आहेत. तिरमलवाडी, मोरगाव आणि हिंगणगाव येथील लहान-मोठे बंधारे देखील आटल्यामुळे स्थानिक पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. विठुरायाचीवाडी येथील तीन बंधाऱ्यांची परिस्थितीही वेगळी नसून धुळगाव आणि रांजणी येथील तुलनेने मोठ्या क्षमतेच्या बंधाऱ्यांनीही तळ गाठला आहे. या सर्व बंधाऱ्यांचा उपयोग मुख्यतः नदीपात्रातील पाणी साठवून विहिरींच्या जलपातळी वाढण्यास होतो, परंतु बंधारे कोरडे पडल्याने अग्रणी नदीपात्रालगत असलेल्या पाणीपुरवठा विहिरींची पातळी वेगाने खाली गेली.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला या योजनेतून पाणी सोडले जाते, यामुळे दिलासा मिळतो. मात्र यावर्षी पाणी सोडलेले नाही. वेळेवर पाणी सोडले गेले असते पिण्याच्या पाण्याची टंचाई एवढ्या लवकर निर्माण झाली नसती. ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाकडे म्हैसाळचे पाणी अग्रणी पात्रात सोडण्याची मागणी केली आहे. चार दिवसांत पाणी सोडले नाही तर वारणाली येथील ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन व व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.
- सुरेखा जाधव, सरपंच, मळणगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT