कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रलंबित विकासकामे आणि विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मंगळवारी संतप्त नागरिकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला.
खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत नागरिकांनी प्रशासनाला थेट जाब विचारत तक्रारींचा पाऊस पाडला. यावेळी उपस्थित नागरिक आणि ग्रामस्थांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. बैठकीस प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपजिल्हाधिकारी विजया यादव, तहसीलदार अर्चना कापसे, जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील, संजय बनसोडे, पंचायत समिती सदस्य दिलीप झुरे, प्रभावती निकम, गट विकास अधिकारी उल्हास भांगे, जयसिंगराव शेंडगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीत राज्य परिवहन महामंडळ, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, दुय्यम निबंधक तसेच पुरवठा विभागाच्या कामकाजावर नागरिकांनी थेट प्रश्न उपस्थित करत लेखी निवेदने सादर केली. गजानन कोठावळे यांनी नूतन फार्मसी कॉलेज येथे बसथांबा सुरू करण्याची मागणी केली. देशिंग गावातून केवळ एकच बस धावते, ती अपुरी असल्याने दोन बसेस सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली. दादासाहेब ढेरे यांनी कवठेमहांकाळ शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी बंडगरवाडी प्रकल्प कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी प्रकल्प लवकरच सुरू होईल, असे सांगितले.