वैभव केंगार
कवठेमहांकाळ : तालुक्याचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाणारे कवठेमहांकाळ शहर सध्या वेगाने विस्तारत असून शहराचा चेहरामोहरा बदलत चालला आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच नव्या वस्त्या, उपनगरे आणि टोलेजंग इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असल्याने नगरपंचायतीच्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. शहराचा चौफेर विस्तार होत असताना मूलभूत सुविधा पुरवताना नगरपंचायतीची मोठी कसरत सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
शहरातील विद्यानगर, महांकाली हायस्कूल परिसर, काळे प्लॉट, एन. टी. पाटीलनगर, युवावाणी चौक, आंबेडकरनगर, जत रोड व झुरेवाडी रोड या परिसरामध्ये शहराची वस्ती पूर्वीपासूनच दाट आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत शहराचा विस्तार वेगाने वाढला असून देशिंग रोड, हिंगणगाव रोड, कुची रोड, नरघोल रोड या नव्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू झाली आहेत. या परिसरात बहुमजली इमारती उभ्या राहत असल्याने शहराची हद्द दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
शहरातील जमिनींचे दर गगनाला भिडले असून मोकळी जागा दुर्मीळ होत चालली आहे. जवळपास सर्वच भागात उंच इमारती उभ्या राहात असल्याने शहराचा विस्तार पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण अशा सर्व दिशांनी होत आहे. या अनियंत्रित वाढीमुळे भविष्यात शहर नियोजनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या इमारतींसोबतच पाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, वीज पुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नगरपंचायतीकडून शहरातील विविध प्रभागांमध्ये नियमित सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू असला तरी, नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरांमध्ये सुविधा पोहोचवताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
एकीकडे जुन्या वस्तीतील समस्या सोडवण्याचे आव्हान असताना दुसरीकडे नव्या भागांमध्ये पाणी, रस्ते व स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध करून देणे नगरपंचायतीसाठी कठीण ठरत आहे. शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, दीर्घकालीन विकास आराखडा, पायाभूत सुविधांची क्षमता वाढवणे आणि भविष्यातील लोकसंख्येचा अंदाज घेऊन नियोजन करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा सुविधा व्यवस्थेवर येणारा ताण वाढण्याची शक्यता आहे.
कवठेमहांकाळ शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे नगरपंचायतीत कर्मचारी संख्याबळ अपुरे पडत आहे. अनेक विविध कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. जनतेच्या भल्यासाठी व शहराच्या विकासासाठी नगरपरिषद होणे गरजेचे आहे. यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू.- संदीप गिड्डे-पाटील भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस