कवठेमहांकाळ : तालुक्यातील सिलेंडर गॅसची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक हैराण झाले होते. नियोजनाच्या अभावामुळे बुधवारी सकाळी नांगोळे रस्त्यावरील गॅस गोडाऊनजवळ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेरीस पोलिस आणि महसूल प्रशासनाने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेले ग्राहक बुधवारी पहाटेपासून रखरखत्या उन्हात नांगोळे रस्त्यावरील गोडाऊनबाहेर रांगेत उभे होते. यावेळी प्रशासनाने गॅस टाक्यांचे वितरण थेट ग्रामीण भागात गावोगावी करण्याचे नियोजन जाहीर केले. हे ऐकून रांगेत उभे असलेले ग्राहक अधिकच संतापले. ग्रामीण भागातच गॅस मिळणार होता, तर आम्हाला पहाटेपासून इथे का ताटकळत ठेवले ? असा सवाल करत गॅस वितरणाच्या गाड्या रोखून धरल्या.