मारुती पाटील
येडेनिपाणी : कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी राखीव झाला आहे. यामुळे निवडणुकीत येथे कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे. निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार, याबाबतही उत्सुकता आहे.
या गटातील पंचायत समितीचा कामेरी गण खुला आहे, तर ऐतवडे बुद्रुक गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. कामेरी जिल्हा परिषद गटात शिवपुरी, ठाणापुडे, कार्वे, ऐतवडे बुद्रुक, करंजवडे, वाघवाडी, विठ्ठलवाडी, जांभुळवाडी, शेखरवाडी, ढगेवाडी, डोंगरवाडी या तेरा गावांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांच्या गटाविरोधात विकास आघाडी स्थापन केली. शिवाजीराव नाईक गटाच्या सुरेखा जाधव यांनी जयंत पाटील गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या छाया पाटील यांचा 423 मतांनी पराभव केला.
कामेरी गणात महाविकास आघाडीच्या सविता पाटील यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांचा 51 मतांनी पराभव केला. ऐतवडे बुद्रुक गणात जयंत पाटील गटाच्या धनश्री माने यांनी नाईक गटाच्या अलका काळगडे यांचा 143 मतांनी पराभव केला. जयंत पाटील यांच्या हातून हा मतदारसंघ गेला होता. त्यामुळे या निवडणुकीत मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी जयंत पाटील गट प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतील, तर महायुतीचे, आ. सत्यजित देशमुख, आ. सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे आपल्याच गटाला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे महायुतीत उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळेल.
होऊ घातलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील, विक्रम पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उद्योजक एम. के. जाधव, शहाजी पाटील; तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे जि. प.चे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील व डॉ. रणजित पाटील यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. तसेच जयराज पाटील यांनी उमेदवारी निश्चित म्हणून मतदारसंघात संपर्क वाढवला आहे.