कडेगाव शहर : कडेगाव तालुका काँग्रेसचाच असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. डॉ. विश्वजित कदम, काँग्रेस नेते शांताराम कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवारांनी तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांवर व पंचायत समितीच्या आठपैकी सात गणांवर काँग्रेसचा झेंडा फडकविला. भाजपला केवळ पंचायत समितीच्या कडेपूर या एकाच गणावर समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या या बलाढ्य विजयाने तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलून टाकली आहेत. पंचायत समितीत काँग्रेसने सत्तांतर करून मागील पराभवाचे उट्टे काढले आहेत.
कडेगाव सोडून 54 गावांत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धामधूम पार पडली. यावेळी भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी सरळ मुख्य लढत होती. मतमोजणीत पहिल्या फेरीपासून काँग्रेस आघाडीवर राहिली. अखेरच्या फेरीअखेर काँग्रेसने मोठी बाजी मारत जिल्हा परिषदेचे चारही गट, तर पंचायत समितीच्या सात गणावर दणदणीत विजय मिळविला. विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला. या विजयामुळे डॉ. विश्वजित कदम यांचे नेतृत्व, संघटनकौशल्य आणि जनसंपर्काची ताकद पुन्हा सिद्ध झाली असून, आगामी स्थानिक व विधानसभेच्या राजकारणात कडेगाव तालुक्यात काँग्रेस निर्णायक भूमिका बजावणार, हे या निकालातून ठळकपणे समोर आले आहे.
भाजपच्या कडेपूर बालेकिल्ल्याला सुरुंग
कडेपूर गट हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. आजवर हा गट काँग्रेसला कधी काबीज करता आला नव्हता. परंतु हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणातून माजी आमदार मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश हणमंतराव कदम यांनी भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या गणात निवडणूक लढवत तब्बल अडीच हजारांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. डॉ. जितेश कदम यांच्या उमेदवारीने केवळ हिंगणगाव बुद्रुकमध्येच नव्हे, तर कडेपूर जिल्हा परिषद गटातही राजकीय चित्र पालटले. त्यांच्या प्रभावामुळे काँग्रेसच्या विद्या कुंभार यांचा विजय सुनिश्चित झाला आणि कडेगाव तालुक्यात काँग्रेसच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा नवा अध्याय लिहिला गेला.