कडेगाव : तालुक्यात बहरलेले सोयाबीनचे पीक. 
सांगली

Sangli News : पाऊस गरजेचाच; अन्यथा परिस्थिती बिकट?

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी

पुढारी वृत्तसेवा

रजाअली पिरजादे

कडेगाव शहर : कडेगाव तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण सुमारे २५ टक्क्यांनी कमी राहिले आहे. मे आणि जून हे महिने जवळपास कोरडे गेल्याने खरीप पेरण्या लांबणीवर पडल्या. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आणि सुमारे ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाने ओढ दिल्याने आता सप्टेंबरमध्ये किमान सरासरी पाऊस होणे गरजेचे आहे. अन्यथा पिकांच्या भवितव्याबाबत चिंता वाढण्याची शक्यता आहे.

पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या तालुक्यात पावसातील तुटीचा थेट परिणाम शेतीवर झाला आहे. पेरणीनंतर पिकांच्या वाढीसाठी सातत्याने पाऊस आवश्यक असताना ऑगस्टमध्ये मोठा खंड पडला. त्यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागू शकतो. उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

यंदा खरीप हंगामाबरोबर आडसाली ऊस लागवडीचे क्षेत्रही सरासरी इतके राहिले आहे. मात्र, आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास त्यावरही परिणाम होऊ शकतो. पावसाअभावी विहिरी, तलाव, बंधारे आणि अन्य जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाबरोबरच आगामी रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.

जुलैमध्ये झालेल्या पावसाने काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी पुढील काळातील पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता सप्टेंबरच्या पावसाकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT