कडेगाव : औद्योगिक वसाहतीला कधी मिळणार उर्जीतावस्था? 
सांगली

Sangli News : कडेगाव औद्योगिक वसाहत रामभरोसे

नऊ वर्षांपासून वस्त्रोद्योग बंद; 95 टक्के उद्योगांना टाळे : शासनाच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक विकासाला खीळ

पुढारी वृत्तसेवा

रजाअली पिरजादे

कडेगाव शहर : कडेगाव-शिवाजीनगर येथील स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकारातून उभारलेली सुमारे अडीचशे एकर क्षेत्रातील औद्योगिक वसाहत सध्या अस्तित्वासाठी झगडत आहे. नऊ वर्षांपासून येथील वस्त्रोद्योग जवळपास बंद असून, विविध कारणांमुळे तब्बल ९५ टक्के उद्योगांना टाळे लागले आहे. त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले असून, शहरातील व्यापार आणि पूरक व्यवसायांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कराड-विटा राष्ट्रीय महामार्गालगत उभारलेल्या या वसाहतीत सुरुवातीच्या काळात गारमेंट पार्कसह सुमारे १०० उद्योग कार्यरत होते. येथे तयार होणाऱ्या कापडाला पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर आणि सुरत बाजारपेठेत मोठी मागणी होती. दोन हजारांहून अधिक कामगारांना रोजगार मिळत असल्याने कडेगावच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली होती. हॉटेल, किराणा, वाहतूक, वाहन दुरुस्ती, चहाच्या टपऱ्या आदी पूरक व्यवसाय तेजीत आले होते.मात्र औद्योगिक मंदी, शासनाकडून वेळेवर अनुदान न मिळणे, आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव, प्रशासकीय अडचणी, काही उद्योजकांची आर्थिक मर्यादा आणि बँकांच्या कारवायांमुळे उद्योग आर्थिक संकटात सापडले.

परिणामी एकामागून एक उद्योग बंद पडत गेले आणि औद्योगिक वसाहतीची आर्थिक साखळीच कोलमडली.आज वसाहतीत शांततेचे वातावरण असून वस्त्रोद्योगासह बहुतांश उद्योग बंद आहेत. रोजगाराच्या संधी कमी झाल्याने अनेक युवकांना परगावी जावे लागत असून, कडेगाव शहराच्या आर्थिक उलाढालीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

पुनरुज्जीवनासाठी ठोस आराखड्याची गरज: बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज, रखडलेली अनुदाने तातडीने वितरित करणे, नव्या उद्योजकांना प्रोत्साहन, आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्योगांसाठी सुलभ धोरण राबविणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, कडेगाव नगरपंचायत, शिवाजीनगर ग्रामपंचायत आणि संबंधित औद्योगिक विभागाने संयुक्तपणे पुनरुज्जीवनाचा ठोस आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कडेगाव-शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीतील जवळपास सर्वच वस्त्रोद्योग बंद अवस्थेत आहेत. शासनाने उद्योग पुनर्जीवित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. आर्थिक मदत, तसेच सुत आणि वीजदरात सवलत देऊन या वसाहतीला नवसंजीवनी देण्याची गरज आहे.
- अजय भस्मे, उद्योजक, कडेगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT