सांगली : या सप्ताहात शाळू ज्वारी, तांदूळ, गहू यांचे दर भडकले आहेत. इतर किराणा मालाचे दर स्थिर आहेत. तांदळाचे, डाळींचे दर किलोला जवळपास दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. शाळू ज्वारी आता ७० रुपयावरुन ८० रुपये किलोवर पोहोचली आहे. जिऱ्याचे दर शंभर रुपयांनी वाढले असून, दर आता २५० वरून ३५० रुपये किलो झाला आहे.
गेल्या पंधरा दिवसात शाळू ज्वारीचे दर प्रति किलो २० रुपयांनी वाढले आहेत. ज्वारीचा क्विंटलचा दर ६ हजार ६०० वरून ७ हजार ५०० रुपये झाला आहे. सर्वसाधारण तांदळाचे दर तब्बल २० रुपयांनी वाढले आहेत. सर्वसाधारण तांदळाचा दर ६० वरून आता ८० रुपये किलो झाला आहे. सर्वच डाळींचे दर १५ ते २० रुपये किलोला वाढले आहेत. खाद्यतेलाचे दर १८० ते १८५ रुपये किलो आहे. हरभरा डाळ ११० रुपये किलो आहे, तूरडाळ १६० वरुन १८० रुपये, तर मूगडाळ १३० वरुन १४० रुपये किलो झाली आहे.
उडीद डाळ १४० रुपयांवरून
आता १६० रुपये किलो झाली आहे. गूळ ६५ ते ७० रुपये किलो आहे. खाद्यतेलामध्ये सरकी तेल १८० ते १८५ रुपये, सोयाबीन १७५ ते १८०, तर शेंगतेल २१० रुपये किलो आहे. रवा, मैद्याचे दर पुन्हा पाच रुपयांनी वाढले आहेत. दर आता ५० रुपयावरून ५५ रुपये किलो झाला आहे. गव्हाचा दर पाच रुपयांनी वाढला असून, दर आता ४५ ते ५० रुपये किलो आहे.
साबुदाण्याचा दर ८६ रुपये आहे. मटकीचा दर २२० रुपये किलो झाला आहे. वरीचे तांदूळ २०० रुपये किलो झाले आहेत. खोबरे ३६० ते ३८० रुपये किलो आहे. शेंगदाण्याचा दर १५० रुपये किलो आहे. हायब्रीड ज्वारी ४५ ते ५० , मसूरडाळ ८० रुपये किलो आहे.