आष्टा : मुलीला तलाठी म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वाळवा येथील एका वृद्धाची 12 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जहांगीर गुलाब गोलंदाज (रा. 1174/क-1, टाकाळा, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी हमजेखान गुलाब मुजावर (वय 69, रा. इस्लामपूर रोड, वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना दि. 8 डिसेंबर 2023 ते कालपर्यंतच्या कालावधित घडली. जहांगीर गोलंदाज याने हमजेखान गुलाब मुजावर यांना त्यांच्या मुलीला तलाठी पदावर नोकरी लावतो, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर रोख 50 हजार रुपये व आरटीजीएसद्वारे 12 लाख रुपये स्वत:च्या खात्यात भरून घेतले. मात्र, नोकरी लावली नाही, तसेच पैसेही परत न देता फिर्यादीची एकूण 12 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.
पैसे मागितल्यावर संशयिताने पैसेही देणार नाही आणि तुम्हाला ठेवणारही नाही अशी धमकी दिली आहे. त्यामुळे हमजेखान मुजावर यांनी जहांगीर गोलंदाज याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.