सांगली : कंपनीत चाळीस हजार रुपयांची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी सांगलीतील चौघांकडून प्रत्येकी 31 हजार 500 रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आशिष रामचंद्र सोनावणे (रा. फ्लॅट क्र. बी 10, मिथिलानगरी, पत्रकारनगर, बसस्थानकामागे, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ऑगस्टीन जोसेफ गजभिव (रा. क्लू इंटिलिजेंस डिटेक्टिव्ह डिपार्टमेंट, साल्व्हेशन आर्मी चर्चनजीक, एरंडगाव, शेवगाव, अहमदनगर) आणि श्रीदेवी शीतल पाटील (रा. धनराज अपार्टमेंट, गल्ली क्र. 6 विद्यानगर, वारणाली, सांगली) या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी आशिष सोनावणे यांचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. दोघा संशयितांनी आशिष यांच्यासह अन्य तीनजणांचा विश्वास संपादन केला. त्यांना क्लू इंटिलिजेन्स डिटेक्टिव्ह डिपार्टमेंटच्या सांगलीतील वारणाली येथे असणाऱ्या शाखेत काम देण्याचे आमिष दाखविले.
प्रतिमहिना चाळीस हजार रुपये मानधन मिळेल, असेही सांगितले. याकरिता चौघांकडून प्रत्येकी 31 हजार 500 प्रमाणे चौघांकडून 1 लाख 26 हजार रुपये जमा करून घेतले. हा प्रकार जून 2024 या कालावधीत घडला. मात्र पैसे दिलेल्यांपैकी कोणासही नोकरी लागली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सोनावणे यांच्या लक्षात आले. त्यांनी ऑगस्टीन गजभिव आणि श्रीदेवी पाटील यांच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.