सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील लॉकर फोडणाऱ्या टोळीतील संशयित आदेश बाबुराव शर्मा (वय 30, रा. हसनपूर, जि. बदायू, उत्तरप्रदेश) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सातारा जिल्ह्यात अटक केली. त्याच्याकडून 13 लाख 95 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंत टोळीतील सातजणांना अटक झाली आहे.
झरे येथे दि. 7 जानेवारीरोजी मध्यरात्रीनंतर उत्तर प्रदेशातील टोळीने साथीदारांच्या मदतीने जिल्हा बँकेच्या शाखेतील पाठीमागील खिडकीची काच फोडून गज गॅस कटरने कापले. त्यानंतर आत प्रवेश करून लॉकर रूममधील 22 लॉकर गॅस कटरने तोडले. ग्राहकांनी ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या टोळीचा छडा लावण्यात यश मिळवले. पथकाने संशयित राहुल रंजमीश शर्मा (रा. ककराला, जि. बदायू, उत्तरप्रदेश), विश्वजित विजय पाटील (रा. बांबवडे, ता. पलूस), संकेत अरूण जाधव (रा. बलवडी, ता. खानापूर), इजाज राजू अत्तार (रा. आमणापूर, ता. पलूस), अस्लम ऊर्फ टनटन मिठ्ठोरी खान (रा. ककराला, उत्तरप्रदेश), शकील अकबर कुरेशी (रा. इस्लामनगर, उत्तर प्रदेश) या सहाजणांना अटक केली होती.
गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाला टोळीतील संशयित आदेश शर्मा हा सातारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर सॅकमध्ये 13 लाख 85 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख 10 हजार 500 रुपये, असा एकूण 13 लाख 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. चौकशीत त्याने दोन महिन्यापूर्वी चोरी केल्याची कबुली दिली. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास सुरू आहे.