सांगली : सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकात बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील दीड लाखाचे दागिने व मोबाईल लंपास केल्याचा प्रकार घडला. याबाबत धनश्री प्रमोद राजमाने (वय 29, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धनश्री राजमाने या दि. 27 डिसेंबर 2025 रोजी सांगलीत आल्या होत्या. दुपारी चार ते साडे चारच्या सुमारास त्या बसस्थानकावर आल्या. बसमध्ये गर्दीत चढताना अनोळखी चोरट्याने त्यांच्या पर्समधील दागिने असलेली छोटी पर्स व मोबाईल चोरट्याने लंपास केला. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना काहीवेळाने पर्सची चेन उघडी दिसली. यानंतर चोरीची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी वाहकाला बस थांबविण्यास सांगितले. त्यांनी शोधशोध केली. शुक्रवारी सायंकाळी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.