सांगली : तस्करीतील सुमारे 3.50 कोटी रुपयांचे साडेतीन किलो सोने घेतल्याप्रकरणी सांगलीतील टिळक चौक परिसरातील सराफ व्यावसायिक दीपक सगरे याला जीएसटीच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयाने 48 तासांची ट्रान्झिट कोठडी दिली आहे. त्याला अधिक तपासासाठी नागपूरला नेण्यात आले.
नागपूर येथे 2024 मध्ये सोने तस्करीचा प्रकार समोर आला होता. जीएसटीच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने हा प्रकार उघडकीस आणला होता. तस्करीमध्ये सांगली जिल्ह्यातील विटा परिसरातील दोघांचा समावेश असल्याचे आढळले होते. त्यातील एकाने सांगलीतील सराफ व्यावसायिकास साडेतीन किलो सोने दिल्याची माहिती तपासात समोर आली.
जीएसटीच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई, नागपूर आणि पुणे येथील वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने शुक्रवारी सांगलीत टिळक चौकात दीपक सगरे याच्या दुकानात छापा टाकून तपासणी केली. या कारवाईदरम्यान काही कागदपत्रे जप्त केल्याचे समजते. दरम्यान, सगरे यास अटक करून जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्यास 48 तासांची ट्रान्झिट कोठडी देण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी त्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर येथील कार्यालयाकडे नेण्यात आले आहे.