सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी सोमवारी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, येत्या बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. वसंतदादा बँक प्रकरणातून मुक्तता, जयश्री पाटील व कार्यकर्त्यांना राजकीय बळ आणि महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत पुरेसा वाटा देण्याचे आश्वासन भाजपतर्फे चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
जयश्री पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी व भाजपकडून जोराचे प्रयत्न सुरू होते. अखेर रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयश्री पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क केला आणि सोमवारी सकाळी पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर करण्याचे ठरले. तसे सोमवारी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासमवेत आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सुरेश आवटी होते. आमदार सुरेश खाडे हेही थोड्या वेळाने विजय बंगल्यावर पोहोचले. यावेळी मदनभाऊ गटाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. माजी महापौर किशोर जामदार, किशोर शहा, आनंदराव पाटील, सुभाष यादव, नरसगोंडा पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, माजी सभापती हणमंत पवार, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संजय मेंढे, माजी सभापती संतोष पाटील, विष्णुअण्णा पाटील खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, प्रकाश मुळके, प्रशांत पाटील, शेवंता वाघमारे, मृणाल पाटील, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, उदय पाटील यांच्यासह मदनभाऊ पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जयश्री पाटील यांना फोन आला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली. मात्र आपला निर्णय झाला असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, विखे-पाटील, मोहिते-पाटील यांच्यासह महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक मोठ्या घराण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण वसंतदादा घराण्यातील कोणी भाजपमध्ये आले नाही, हे शल्य होते. आता जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश होत असल्याने हे शल्य कमी होत आहे. भाजपची राजकीय ताकद वाढावी, यासाठी जयश्री पाटील यांना पक्षात घेतले. सर्वसामान्य माणसांची दखल घेणे, शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवणे ही भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे. तीच संस्कृती वसंतदादा घराण्याची आहे.
‘वसंतदादा बँक प्रकरणातून आज दुपारपर्यंत जयश्री पाटील व त्यांच्या दोन मुलींची मुक्तता करू व टप्प्या-टप्प्याने सर्वांना मुक्त करू’, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी जयश्री पाटील यांना दिला. मात्र या प्रकरणातून एकाचवेळी सर्वांना बाहेर काढा, अशी मागणी जयश्री पाटील यांनी केली. त्यांनी स्वत:साठी नव्हे, तर कार्यकर्त्यांसाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. वसंतदादा बँकप्रकरणी कायदेशीर चौकटीत बसवून त्यांना व त्यांच्या सहकार्यांना सोडवले जाईल. त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून बळ दिले जाईल. जयश्री पाटील यांनी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या उपस्थितीत येत्या बुधवारी हा पक्षप्रवेश होणार आहे. जयश्री पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समितीसह जिथे जिथे सत्तेचे वाटप आहे, तिथे पुरेशी संधी देणार आहे. भाजपमध्ये येणार्या प्रत्येकाला पक्षाने सन्मानाने वागवले आहे. भाजपमध्ये जयश्री पाटील यांना शंभर टक्के न्याय दिला जाईल.
जयश्री पाटील म्हणाल्या, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी व जनतेच्या हितासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वत: बोलले. त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचे त्यांनी मान्य केले आहे. बुधवारी हा पक्षप्रवेश होणार आहे. सांगलीच्या विकासासाठी, लोकांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा पक्षप्रवेश होत आहे. माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपची वाट धरली आहे. भाजप बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील.
काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर कोणत्या तरी पक्षात प्रवेश करणे आवश्यकच होते. भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्याकडून पक्षप्रवेशाची ऑफर होती. याबाबत गेले तीन महिने मी कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाचे मत मांडले. लोकांची कामे करण्यासाठी, येणार्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे जयश्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीची ऑफर कोणत्या मुद्द्यावर नाकारली?, या प्रश्नावर जयश्री पाटील म्हणाल्या, ‘भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपमध्येच प्रवेश करावा, असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला, तो निर्णय मी मान्य केला.’
महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 20 नगरसेवक निवडून आले. त्यातील 10 नगरसेवक जयश्री पाटील यांच्यासोबत आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उर्वरित 9 माजी नगरसेवक हे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांचे नेतृत्व मानणारे आहेत. एका नगरसेवकाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे.