विटा येथील कार्यक्रमात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर. Pudhari Photo
सांगली

जयंतरावांचं अजूनही तळ्यात मळ्यात, पण आम्ही विरोध करणारच : आमदार गोपीचंद पडळकर

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर केल्याबद्दल पडळकरांचा नागरी सत्कार

पुढारी वृत्तसेवा

विटा : जयंतरावांचं अजून पण तळ्यात मळ्यात आहे. त्यांना कुठे जायचं आहे, हे नक्की नाही. पण मी आणि सदाभाऊ त्यांना ताकदीने विरोध करणारच, अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या कथित भाजप प्रवेशाला जाहीर विरोध दर्शविला आहे.

शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापुर येथे मंजूर केल्याबद्दल आमदार पडळकर यांचा तालुका भाजपच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री सदाशिव खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, डॉ. रविंद्र आरळी आदी उपस्थित होते.

आमदार पडळकर म्हणाले, आपल्याकडे लढणारे आणि विरोधकांना लोळवणारे उमेदवार आहेत. त्यामुळे पं.स, जि.प. सह पालिकांतून या तालुक्यात परिवर्तन झाले पाहिजे, नव्यांना संधी मिळाली पाहिजे. अशा उमेदवारांच्या पाठीशी आपण ताकदीने उभारणार आहोत. गेल्या दोन विधानसभा निवडणूकीत मला इथून लढता आले नाही. मात्र तरीही तुम्हाला निधी कमी पडणार नाही, फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे खानापूर मतदारसंघासाठी वेगळा निधी आपण मंजूर करून आणू. खानापूर तालुक्यात आणि जिल्ह्यात आपण ताकदीने पक्ष बांधणी करू. जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागा, असे आवाहनही आ. पडळकर यांनी केले.

माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, गोपीचंद पडळकर हे जनतेतून आमदार होऊ शकतात, हे जतच्या जनतेने दाखवून दिले. फिनिक्स पक्षाप्रमाणे पडळकर यांनी राजकारणात भरारी घेतली. मंत्रीपद हा नशिबाचा खेळ आहे. दोस्ती कशी करावी आणि टिकवावी हे आमदार पडळकर यांच्याकडून शिकावे. जे रोखठोक बोलतात त्यांच्या मनात काही असत नाही. समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात पडळकर यांनी स्थान निर्माण केलं आहे असेही खोत म्हणाले.

प्रमोद भारते यांनी स्वागत आणि प्रास्ताविक, तर प्रथमेश सांळुंखे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रविंद्र आरळी, निलेश पाटील, संदीप ठोंबरे, दाजी पवार यांचीही भाषणे झाली. यावेळी संतोष यादव, सचिन कदम, राहुल मंडले, माणिक शिंदे, सामराय तुंबगी, सुहास कुलकर्णी, करण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT