Vishwajit Kadam | जयंतराव, विशालचे मिटविले; जिल्ह्यातील नेत्यांमध्येही समेट : आ. डॉ. विश्वजित कदम Pudhari
सांगली

Vishwajit Kadam | जयंतराव, विशालचे मिटविले; जिल्ह्यातील नेत्यांमध्येही समेट : आ. डॉ. विश्वजित कदम

नेवरी येथे कार्यक्रम; मतभेद बाजूला ठेवून ‌‘जि. प., पं. स.‌’ जोमात लढवा

पुढारी वृत्तसेवा

नेवरी : जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माजी मंत्री जयंत पाटील व खासदार विशाल पाटील यांच्यामधील कडवा विरोध संपवून त्यांच्यामध्ये समेट घडवून त्यांना एकत्र आणले आहे. जिल्ह्यातील नेत्यांमध्ये समेट घडविता येत असेल, तर मतदार संघांतील गावा-गावांमधील जयंतराव आणि विशाल यांचे मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणणे मला अवघड नाही. यामुळे गावाचा विकासही होईल, असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवावी, असे आवाहनही त्यांनी येथील कार्यक्रमात केले. डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधीमधून बांधण्यात आलेल्या श्री महादेव मंदिर सभागृहाचे उद्घाटन झाले. यावेळी लोकनियुक्त सरपंच प्रमिला साळुंखे, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांतारामबापू कदम, भारती बँक संचालक डॉ. जितेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य रंगरावतात्या महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी महाडिक, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अविनाश पोळ उपस्थित होते.

यावेळी डॉ. जितेश कदम म्हणाले, मतदार संघामध्ये सर्वांना पाहता येईल असा शाश्वत विकास आम्ही केला आहे आणि करणारही आहे. विरोधकांनी खोटी व भूलथापांची आश्वासने देत विकास कामांना खो घातला आहे. केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडत आहोत. यामुळेच न झालेल्या कामांची चर्चा करून विरोधक दिशाभूल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवक काँग्रेसचे इंद्रजित साळुंखे, डॉ. विजय महाडिक व बापूसाहेब महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. कदम यांनी ठेकेदार उमेश साळुंखे यांचा सत्कार केला.

कार्यक्रमास माजी सभापती सुमन महाडिक, सदस्या स्वाती महाडिक, माजी सरपंच मोहन सूर्यवंशी, शंकर महाडिक, किरण चव्हाण, युवराज ननवरे, राजाराम महाडिक, शशिकांत महाडिक, विष्णू महाडिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT