इस्लामपूर : कोणत्याही निवडणुकीचा निकाल असला की, येथील पोलिस परेड मैदानावर निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी असायची. मात्र, आजचा निकाल त्याला अपवाद ठरला. पोलिस परेड मैदानावर एकच शुकशुकाट होता. राज्यात महाविकास आघाडीचा दारूण पराभव व जयंत पाटील यांचा काठावरील विजय यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा होता. तर महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांचा पराभव झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांतही नाराजी होती. त्यामुळे विजयानंतर शहरात फारसा जल्लोष झाला नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात महिला व काही उत्साही कार्यकर्त्यांकडून तहसील कचेरी परिसरात जल्लोष करण्यात आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयातही शुकशुकाट होता.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अवघ्या 13 हजार 23 मतांनी विजय मिळवत आपला गड शाबूत ठेवला. मात्र, हे घटलेले मताधिक्य त्यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे. आजवरच्या अनेक निवडणुकांशी तुलना करता महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी सर्व गटांना सोबत घेऊन दिलेली निकराची झुंज लक्षवेधी ठरली.
जयंत पाटील यांना चांगली साथ देत विजयासाठी इस्लामपूर शहराने मोठा हातभार लावला. मात्र, आष्टा शहरासह कृष्णाकाठावर त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. तर निशिकांत पाटील यांनी भवानीनगर, रेठरेहरणाक्ष, खरातवाडी, बेरडमाची, दुधारी, समडोळी, कवठेपिरान आदी गावांत आघाडी घेतली. ग्रामीण भागात कोरेगावने जयंत पाटील यांना साडेआठशेचे मताधिक्य दिले. जयंत पाटील यांना 1 लाख 9 हजार 879, तर निशिकांत पाटील यांना 96 हजार 852 मते मिळाली. नोटाला 1 हजार 21 मते मिळाली. 166 पोस्टल मते बाद ठरली. अन्य उमेदवारांना मिळून 4 हजार 633 मते मिळाली. जयंत पाटील यांना 1 हजार 831 तर निशिकांत पाटील यांना 715 पोस्टल मते मिळाली.
सकाळी 8 वाजता येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत जयंत पाटील यांनी 691 मतांची आघाडी घेतली. 10 व्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम होती. 11 व्या फेरीत निशिकांत पाटील यांना 467 मतांचे मताधिक्य मिळाले. तोपर्यंत जयंत पाटील यांचे मताधिक्य 12 हजारांच्या पुढे गेले होते. त्यानंतर 13, 14 व 17 व्या फेरीत निशिकांत पाटील यांना काहीशी आघाडी मिळाली. इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांना 7 हजारांच्या पुढे आघाडी मिळाली, तर आष्टा शहरात केवळ 83 मते जादा मिळाली. आष्टा येथून जयंत पाटील यांना मिळालेले हे अल्प मताधिक्य धक्कादायक ठरले. इस्लामपूर शहरात निशिकांत पाटील यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे ते पिछाडीवर गेले. मिरज तालुक्यातील गावातूनही दोन्ही उमेदवारांत निकराची झुंज पाहायला मिळाली.