इस्लामपूर : नगरपालिकेची निवडणूक तोडीस तोड लढवू, चिंता करण्याचे कारण नाही. गेल्या आठ वर्षांत शहरातील जनतेला जो अनुभव आला आहे, त्यावरून जनता निश्चितच आपल्याला पसंती देईल, असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तळागाळात जाऊन कार्य करणारा कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने आयोजित बुथ अध्यक्ष व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शहरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच बुथ अध्यक्षांचा जयंत पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
आ. पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे काही प्रमाणात मताधिक्य कमी झाले असले तरी, जनता आजही आपल्या पाठीशी उभी आहे. गेल्या सात-आठ वर्षांत शहरात एकही नवीन विकासकाम झाले नाही. उलट सुरू असलेली कामे थांबविण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला प्रा. शामराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, खंडेराव जाधव, मुनीर पटवेकर, अरुणादेवी पाटील, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पुष्पलता खरात यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन राज पाटील, मनीषा पेठकर व विजय देसाई यांनी केले.